मेट्रोसिटीप्रमाणे व्यवस्था करण्याची मागणी : खासगी टॅक्सी, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावच्या सांबरा विमानतळावरून बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना टॅक्सी, रिक्षा या खासगी सेवांचा लाभ घ्यावा लागत आहे. परंतु विमानाच्या तिकिटाचा निम्मा दर शहरात येण्यासाठी टॅक्सीचालकांना द्यावा लागत आहे. तसेच भाडे ठरविण्यासाठी तडजोड करावी लागत आहे. त्यामुळे विमानतळावर प्रिपेड टॅक्सी-रिक्षा स्टॅण्ड सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर विमानाने प्रवास करणाऱयांच्या संख्येत वाढ झाली आहे. बेळगावमधून बेंगळूर, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, पुणे, तिरुपती, कडाप्पा, म्हैसूर, इंदूर, नाशिक, जयपूर, अहमदाबाद, अजमेर या शहरांना थेट विमानसेवा सुरू आहे. त्यामुळे दररोज 700 ते 1000 प्रवासी विमानतळावरून ये-जा करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांना एकतर स्वतःचे वाहन अथवा खासगी वाहनावर अवलंबून रहावे लागते. यापूर्वी वायव्य परिवहन मंडळाची बससेवा सुरू होती. परंतु कोरोनापूर्वीपासून बससेवा बंद ठेवण्यात आली आहे.
मेट्रोसिटीप्रमाणे प्रिपेड टॅक्सी स्टॅण्डची गरज
मोठय़ा महानगरांमध्ये प्रिपेड टॅक्सी स्टॅण्ड असल्याने तेथे प्रवाशांची फसवणूक होत नाही. अशीच व्यवस्था बेळगाव रेल्वेस्थानकावर करण्यात आली होती. परंतु रेल्वेस्थानकाच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने तेव्हापासून प्रिपेड रिक्षास्टॅण्ड बंद ठेवले
आहे. त्याच धर्तीवर विमानतळावर प्रिपेड टॅक्सी व रिक्षास्टॅण्ड सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
प्रिपेड टॅक्सी स्टॅण्डमुळे ग्राहकाला टॅक्सीमध्ये बसण्यापूर्वीच भाडे भरावे लागणार आहे. यामुळे ग्राहकाची फसवणूक टाळली जाणार आहे. बेळगाव शहरातून विमानतळापर्यंत जाण्यासाठी 500 ते 700 रुपये रिक्षाला तर 1000 ते 1500 रुपये टॅक्सीला मोजावे लागत आहेत. यामुळे प्रिपेड स्टॅण्ड सुरू केल्यास प्रवाशांची होणारी लूट थांबविता येईल. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने प्रिपेड स्टॅण्ड सुरू करण्याची मागणी केली जात आहे.