दिल्लीत सुरक्षा यंत्रणा अलर्टवर – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. त्यातच दिल्लीतील आयजीआय विमानतळावर अल-कायदाच्या एका दहशतवाद्याकडून मोठा बॉम्ब स्फोट घडवून आणणार असल्याचा धमकी देणारा ई-मेल आल्यामुळे अधिक सतर्कता बाळगली जात आहे. विमानतळावर येणाऱया-जाणाऱया प्रत्येक प्रवाशाची कसून चौकशी केली जात आहे. याशिवाय स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्ली पोलिसांनी मध्यप्रदेशातून दिल्लीत येणारा अवैध शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. या शस्त्रांच्या अवैध तस्करीप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु आहे.
स्वातंत्र्यदिनादरम्यान देशात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत. दिल्लीतील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर आतापासूनच अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याचदरम्यान नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याच्या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. ई-मेलद्वारे विमानतळ उडवण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर विमानतळावरील पोलीस सुरक्षा वाढवण्यात आल्याचे विमानतळ ऑपरेशन नियंत्रण केंद्रातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. स्वातंत्र्यदिनापूर्वी अशाप्रकारे दिल्ली विमानतळ उडवण्याच्या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे. तसेच विमानतळ परिसरात बॉम्बशोधक पथकाकडून शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. सध्या आयजीआय विमानतळाच्या सर्व टर्मिनल्स, प्रवेश नियंत्रण आणि वाहन तपासणी केंद्रांवर तपास सुरू असून गस्त वाढवण्यात आली आहे.