प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर विमानतळावर उभारण्यात येणाऱया नवीन टर्मिनल इमारतीचे काम वर्षअखेरीस पूर्ण करण्याची ग्वाही विमानतळ प्राधिकरणाने दिली. तर नाईट लॅडिंग, विस्तारित धावपटी यासह अन्य तांत्रिक प्रश्नासंदर्भात मार्च महिन्यात डीजीसीए बरोबर बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. विमानतळावरील रखडलेल्या प्रश्नासंदर्भात शनिवारी विमानतळावर बैठक झाली. छत्रपती शाहू महाराज यांची बैठकीला प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूर विमानतळावरुन सद्या रोज 14 विमानांचे उडडाण होत आहे. पण काही प्रश्न प्रलंबित आहेत. नाईट लँडिंग, टर्मिनल इमारत, धावपटी, तामगाव रस्ता, 64 एकर जागेचे संपादन, चिकूची बाग, कळंब्याचा टॉवर असे अडथळे आहेत. टर्मिनल इमारतीचे काम चार वर्षापासून सुरु आहे. या कामात गती नसल्यामुळे अद्याप ते पूर्ण नाही. सर्व प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. खासदार संजय मंडलिक, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार ऋतुराज पाटील, आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, विमानतळ संचालक कमल कटारिया, प्रांताधिकारी वैभव नावडकर, अमित हुक्केरीकर यांची उपस्थिती होती.
लोकप्रतिनिधी व अधिकाऱयांनी सकाळी विमानतळावर सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. यानंतर बैठक झाली. बैठकीत विमानतळ संचालक कमल कटारिया यांनी प्रलंबित कामांचा आढावा घेऊन सद्यस्थितीची माहिती दिली. यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, उडडाण योजनेत कोल्हापूर विमानतळाचा समावेश आहे. विमानसेवा सुरु झाल्यापासून कोल्हापूर विमातळावरुन जवळपास 2 लाख 13 हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे भविष्यात अन्य मार्गावर उडडाणे होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नवीन टर्मिनल इमारतीचे काम वर्षअखेरीस पूर्ण करण्याची ग्वाही विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. नाईट लॅडिंगमधील काही अडथळे काढले आहेत तर काही काढायचे आहेत. त्यासंदर्भात डीजीसेएबरोबर पुढील महिन्यात दिल्लीत बैठकीचे नियोजन आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबरोबर याबाबत चर्चा झाली आहे. दिल्लीतील बैठकीत तांत्रिक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न होईल. धावपटी 1370 मीटरवरुन 2300 मीटर करण्यात येत आहे.
विमातळासाठी आणखी 64 एकर जागेची आवश्यकता असून या जागेची मोजणी करण्यात येत आहे. राज्य शासनाने यासाठी प्रथम 10 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. या जागेत 336 सातबारा व एक हजार मालक आहेत. एआयडीसीतून पाणीपुरवठा करण्याचा प्रश्न असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाईपलाईन टाकून पुढील आठवडÎात पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. डेडिकेटेड ट्रान्स्फॉर्मरचे काम पूर्ण झाले आहे. तामगाव रस्त्याचे काम अपूर्ण असून त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कार्गो हब, हँगर व फ्लाईंग क्लबचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱयांना दिल्या.
मुंबई सकाळचा स्लॉट मिळण्यासाठी चर्चा
मुंबईतून दुपारी विमानाचे उडडाण होऊन ते कोल्हापूरात येते. दुपारचा हा स्लॉट गैरसोयीचा आहे. सकाळी मुंबईत जावून दिवसभरात काम पूर्ण करुन परत सायंकाळी कोल्हापूरात यावे अशी मागणी आहे. याबाबत जीव्हीके कंपनीशी चर्चा झाली आहे.
डीजीसेए सकारात्मक-
कोल्हापूर विमातळाच्या विमाकासाठी 274 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून सद्याची कामे सुरु आहेत. पण चार वर्षात टर्मिनल इमारत उभा राहत नाही. नाईट लँडिंगला डीजीसेए परवानगी देत नाही असे सांगितले जाते ते चुकीचे आहे. डीजीसीए सकारात्मक आहे. महाराष्ट्र शासनाकडून काही अडथळे आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विमानळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी चर्चा करणार…. खासदार संभाजीराजे छत्रपती
शासनाने समन्वय समिती नेमावी-
कोल्हापूरातून चांगल्या प्रकारे विमानसेवा सुरु झाल्यास कोल्हापूरचा विकास होणार आहे. यासाठी विमानतळाच्या विकासातील अडथळे दूर केले पाहिजेत. हे प्रश्न सुटण्यासाठी समन्वय समितीची गरज आहे. शासनाने समन्वय समिती नेमावी. शाहू महाराज छत्रपती
संभाजीराजे छत्रपती यांचे सारथ्य
विमातळावर प्रवास करताना खासदार संभाजीराजे यांनी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांना घेऊन गाडीचे सारथ्य केले. पालकमंत्री पाटील हे संभाजीराजे छत्रपती यांच्या शेजारील आसनावर बसले होते. तर दोन खासदार मागील आसनावर बसले होते. (फोटो-20225)