बेळगाव विमानतळावरील घटना
बेळगाव : हैद्राबादवरून बेळगावला आलेल्या विमानाचे चुकीच्या ठिकाणी लॅन्डिंग करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रविवारी स्पाईसजेटच्या वैमानिकाने केलेल्या चुकीमुळे विमान थेट धावपट्टीच्या दुसऱया बाजूला गेले. नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए)ने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
बेळगाव विमानतळावर आलेल्या विमानाला एअर ट्रफिक कंट्रोल विभागाने एका धावपट्टीवर उतरविण्याची परवानगी दिली होती. परंतु हे विमान दुसऱयाच धावपट्टीवर उतरविण्यात आले. यामुळे विमान थेट धावपट्टीच्या दुसऱया टोकाला जावून पोहचले. वैमानिकाच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असून दोन्ही वैमानिकांची चौकशी केली जाणार आहे. विमानातील प्रवासी सुरक्षित असून असे प्रकार घडू नये यासाठी चौकशी केली जाणार आहे.
याबाबत बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे विमान दुसऱया धावपट्टीवर उतरल्याचे सांगितले. चुकीच्या धावपट्टीवर विमान उतरविण्यात आल्याने याची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.