ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन, विमानातील मधली सीट शक्यतो रिकामीच ठेवा, असे निर्देश नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) सर्व विमान कंपन्यांना दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रवाशांची संख्या जास्त असल्यास, मधल्या सीट वरील प्रवाशास मेडिकल सेवांसाठी वापरले जाणारे गाउन, थ्री लेअर मास्क व फेस शिल्ड पुरवले जावेत, असे ही डीजीसीएने सांगितले आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली विमानसेवा 25 मे पासून सुरु करण्यात आली आहे. विमानातील मधली सीट रिकामी ठेवावी की नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने, व्यवसायिक त्याऐवजी प्रवाशांचे हित लक्षात घेऊन मधली सेट प्रवाशाला द्यायची की रिकामी ठेवायची याबाबतचा निर्णय घेण्याचे आणि नियमात बदल करण्याचे स्वातंत्र्य डीजीसीएला दिले होते.
त्यानंतर न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण लक्षात घेत डीजीसीएने याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.