विमा पॉलिसीच्या नावाखाली 25 लाखांचा गंडा
प्रतिनिधी/ कराड
वडिलांच्या नावाची विमा पॉलिसी एका मोठय़ा कंपनीत असून ती सोडवण्यासाठी रक्कम भरावी लागेल आहे, अशी बतावणी करून चार महिन्यात रेठरे खुर्द (ता. कराड) येथील युवकाची तब्बल 25 लाख 59 हजार 047 रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अजित सुभाष पवार (वय 29, रा. रेठरे खुर्द) असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे. फोनवरून फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे.
विवेक चौधरी, अरविंद मिश्रा आणि विजेंद्र आझाद (पूर्ण नाव माहिती नाही) अशी फसवणूक करणारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रेठरे खुर्द येथील अजित पवार याच्या मोबाईलवर विवेक चौधरी यांचा फेब्रुवारी महिन्यात फोन आला. तुमच्या वडिलांच्या नावाने एका मोठय़ा कंपनीत विमा पॉलिसी आहे. ती सोडविल्यास तुम्हाला मोठी रक्कम मिळणार अशी बतावणी करण्यात आली. त्यापूर्वी तुम्हाला काही रक्कम भरण्याची कार्यवाही करावी लागेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या वेळी अरविंद मिश्रा व विजेंद्र आझाद यांनीही फोन करून पवार यांच्याशी बोलणे केले. पवार यास काही रक्कम भरण्यास सांगितले. दरम्यान पाच फेब्रुवारी ते पाच मे 2021 या चार महिन्यात अजित पवार याने वेगवेगळ्या वेळी तब्बल 25 लाख 59 हजारांचा रक्कम ते तिघेही सांगतील, त्या खात्यावर जमा केली. रक्कम जमा झाल्यानंतर तीनही संशयितांनी संपर्क करायला टाळाटाळ केली. शिवाय त्यांचे फोनही लागत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे पवार यांची खात्री पटली. त्यांनी याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस उपनिरिक्षक अशोक भापकर तपास करत आहेत.