वार्ताहर/ काकती
काकती येथे झोपडपट्टीत असलेला विमुक्त भटका समाज मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. या समाजाला जीवनावश्यक असलेल्या किराणा मालाचे वितरण दादासाहेब सुर्यवंशी व व्यंकटेश जोशी यांनी करून सामाजिक बांधीलकी जपली आहे. कबाडकष्ट करूनही हालाकीत राहणाऱया समाजाला मदतीचा हात देऊन खऱया माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
मानवी जीवनात समाजातील प्रत्येक घटकाविषयी आपलेपणा बाळगणारी माणसं इतरांच्या सुख-दु:खात गरजेच्या काळात मदतीचा हात देतात. आपल्या गरीबीचा प्रश्न बाजुला ठेवून आपल्या कुवतीने मदत करतात यांचा प्रत्यय काकती येथील व्यवसायाने नाभिक (न्हावी) असलेले दादासाहेब सुर्यवंशी व पेट्रोल पंपात काम करणारे व्यंकटेश जोशी यांनी येथील भटक्या बारा कुटुंब समुहाला तांदूळ, चहापूड, साखर, बिस्किट असे साहित्य वितरण केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन गव्हाणे, सागर कसलकर, रोहन सुर्यवंशी, बाबू आलोरी उपस्थित होते.