वृत्तसंस्था/ मिरपूर
भारतीय संघातील हुकमी आणि अनुभवी फलंदाज तसेच माजी कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशचा अष्टपैलू मेहदी हसन मिराझला खास भेट दिली आहे. विराट कोहलीने आपली स्वाक्षरी केलेली जर्सीवर मेहदी हसनला दिली आहे.
अष्टपैलू मेहदी हसनने या कसोटी मालिकेत दर्जेदार अष्टपैलू कामगिरी केल्याने विराट त्याच्या कामगिरीवर बेहद खुष झाला. भारताने ही मालिका जरी जिंकली तरी बांगलादेशच्या कामगिरीचे खास कौतुक झाले. विराटने आपल्या 18 नंबरच्या जर्सीवर स्वाक्षरी करुन ती मिराझला सुपूर्द केली. या दौऱयामध्ये भारताला वनडे मालिका गमवावी लागली. बांगलादेशने वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेत मिराझने फलंदाजीत 141 धावा तर गोलंदाजीत 4 गडी बाद केले. अष्टपैलू कामगिरीबद्दल मिराजची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर कसोटी मालिकेत मिराझने 2 सामन्यात 11 बळी मिळविले. त्याने या मालिकेत सर्वाधिक बळी मिळविले असून फलंदाजीत त्याने 53 धावा जमविल्या.