ओव्हलवरील चौथी कसोटीः 36 चेंडूत झोडपल्या 57 धावा, भारताचा डाव 191 धावात खुर्दा, दिवसअखेर इंग्लंड 3 बाद 53, बुमराहला दुहेरी यश
वृत्तसंस्था /लंडन
शार्दुल ठाकुरच्या (36 चेंडूत 7 चौकार, 3 षटकारांसह 57) झंझावाती काऊंटर-ऍटॅक करणाऱया अर्धशतकामुळे इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत भारताची फलंदाजीतील नामुष्की टाळली गेली असून बुमराहने दुहेरी झटके दिल्यानंतर पहिल्या दिवसअखेर इंग्लंडची देखील 3 बाद 53 अशी दाणादाण उडाली.
भारताच्या 191 धावांना प्रत्युत्तर देताना रोरी बर्न्स (5) व हसीब हमीद (0) बुमराहच्या उसळत्या माऱयासमोर स्वस्तात बाद झाले आणि त्यानंतर उमेश यादवने दुसऱया स्पेलमध्ये एका अप्रतिम ऑफकटरवर जो रुटचा (21) मोठा अडथळा दूर सारला.
प्रारंभी, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळालेल्या भारताची विराटच्या अर्धशतकानंतरही (96 चेंडूत 50) एकवेळ 7 बाद 127 अशी दाणादाण उडाली. पण, आपली केवळ चौथी कसोटी खेळणाऱया शार्दुल ठाकुरचा झंझावात ओव्हलवर अवतरला आणि त्याने पाहता पाहता संघाला द्विशतकाच्या उंबरठय़ावर आणून ठेवले. शार्दुलने उमेशसमवेत आठव्या गडय़ासाठी 63 धावांची भागीदारी साकारली, ते ठळक वैशिष्टय़ ठरले.
या लढतीत कर्णधार विराट कोहलीने (96 चेंडूत 50 धावा) दमदार अर्धशतक झळकावल्यानंतर देखील भारतीय संघाला अव्वल दर्जाच्या इंग्लिश गोलंदाजीविरुद्ध पुन्हा एकदा झगडावे लागले. पहिल्या दिवशी चहापानाअखेर भारताचा डाव 51 षटकात 6 बाद 122 असा गडगडला आणि यातून ते सावरु शकले नाहीत.
कोहलीचे अर्धशतक
कोहलीने काही दमदार कव्हर ड्राईव्ह लगावत प्रतिभाशाली फलंदाजीची चुणूक दाखवून दिली. मात्र, प्रगतिपथावर असलेल्या रॉबिन्सनने (16-9-24-2) पुन्हा एकदा भारतीय कर्णधाराला चकवा दिला आणि जॉनी बेअरस्टोने सोपा झेल टिपल्यानंतर विराटची अर्धशतकी खेळी संपुष्टात आली.
जो रुटने स्लीपमध्ये वोक्सच्या गोलंदाजीवर विराटचा झेल सांडला होता. पण, याचा विराटला फारसा लाभ घेता आला नसल्याचे स्पष्ट झाले. कोहली बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजा (10) व अजिंक्य रहाणे (14) स्वस्तात बाद झाले आणि याचा भारताला फटका बसला. खराब फॉर्ममध्ये असलेल्या रहाणेऐवजी जडेजा पाचव्या स्थानी बढतीवर आला. पण, जडेजा व रहाणे दोघेही अपयशी ठरले.
रहाणे सातत्याने झगडत होता आणि पेग ओव्हर्टनने (11-2-30-1) त्याला तिसऱया स्लीपमधील मोईन अलीकडे झेल देणे भाग पाडले. प्रारंभी, रोहित शर्मा (11) व केएल राहुल (17) दर्जेदार सीम गोलंदाजीसमोर अपयशी ठरले. जेम्स अँडरसनने चेतेश्वर पुजाराला बाद केलेला चेंडू बॉल ऑफ द सिरीज ठरावा, इतका उत्तम होता. इंग्लिश कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते.
धावफलक
भारत पहिला डाव : रोहित शर्मा झे. बेअरस्टो, गो. वोक्स 11 (27 चेंडूत 1 चौकार), केएल राहुल पायचीत गो. रॉबिन्सन 17 (44 चेंडूत 3 चौकार), पुजारा झे. बेअरस्टो, गो. अँडरसन 4 (31 चेंडूत 1 चौकार), विराट झे. बेअरस्टो, गो. रॉबिन्सन 50 (96 चेंडूत 8 चौकार), जडेजा झे. रुट, गो. वोक्स 10 (34 चेंडूत 2 चौकार), रहाणे झे. अली, गो. ओव्हर्टन 14 (47 चेंडूत 1 चौकार), पंत झे. अली, गो. वोक्स 9 (33 चेंडूत 1 चौकार), शार्दुल पायचीत गो. वोक्स 57 (36 चेंडूत 7 चौकार, 3 षटकार), उमेश यादव झे. बेअरस्टो, गो. रॉबिन्सन 10 (20 चेंडूत 1 चौकार), बुमराह धावचीत (बर्न्स) 0 (0 चेंडू), सिराज नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 8. एकूण 61.3 षटकात सर्वबाद 191.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-28 (रोहित, 8.6), 2-28 (राहुल, 13.5), 3-39 (पुजारा, 19.4), 4-69 (जडेजा, 29.6), 5-105 (विराट, 42.5), 6-117 (रहाणे, 49.5), 7-127 (रिषभ, 52.6), 8-190 (शार्दुल, 60.6), 9-190 (बुमराह, 61.1), 10-191 (यादव, 61.3)
गोलंदाजी : अँडरसन 14-3-41-1, रॉबिन्सन 17.3-9-38-3, वोक्स 15-6-55-4, ओव्हर्टन 15-2-49-1.
इंग्लंड पहिला डाव : बर्न्स त्रि. गो. बुमराह 5 (11 चेंडू), हमीद झे. पंत, गो. बुमराह 0 (12 चेंडू), मलान खेळत आहे 26 (46 चेंडूत 4 चौकार), रुट त्रि. गो. यादव 21 (25 चेंडूत 4 चौकार), ओव्हर्टन खेळत आहे 1 (8 चेंडू). अवांतर 0. एकूण 17 षटकात 3 बाद 53.
गडी बाद होण्याचा क्रम
1-5 (बर्न्स, 3.2), 2-6 (हसीब, 3.6), 3-52 (रुट, 15.3).
गोलंदाजी
उमेश यादव 6-1-15-1, बुमराह 6-2-15-2, शार्दुल ठाकुर 3-1-11-0, सिराज 2-0-12-0.
अश्विनला का वगळले? कोहलीच्या खुलाश्यानंतरही कारण गुलदस्त्यात!
काहीच दिवसांपूर्वी अश्विनने शॅडो बॅटिंगची काही छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली होती. एका छायाचित्रात तो कव्हर ड्राईव्हचा फटका घोटवत होता तर एका छायाचित्रात चेंडू सोडून देण्याचा सराव करत होता. मात्र, गुरुवारी चौथ्या कसोटी सामन्यात अंतिम संघातून पुन्हा एकदा त्याला बाहेरच ठेवले गेले आणि दस्तुरखुद्द इंग्लिश कर्णधार मायकल वॉनने देखील यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
या कसोटीसाठी अतिरिक्त फलंदाज खेळवावा, अशी स्पष्ट सूचना करणाऱया सुनील गावसकरांनी सध्या निवडलेल्या संघाच्या पाठीशी आपण असू आणि निकाल येईतोवर या संघावर काहीही प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका घेतली.
कर्णधार विराट कोहलीने इंग्लिश संघात 4 डावखुरे फलंदाज असल्याने जडेजाला पसंती दिल्याचे नमूद केले. मात्र, यापूर्वीची कामगिरी पाहता, अश्विनच इंग्लिश फलंदाजांना अधिक पेचात टाकू शकला असता, ही शक्यता का गृहित धरली गेली नाही, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
अश्विन व्यक्त होतो, हीच खरी समस्या आहे का?
अश्विन हा एक्स्प्रेसिव्ह मानला जातो. आपली सर्व मते तो रोखठोकपणे मांडण्यास कचरत नाही आणि याचमुळे त्याच्यावर वक्रदृष्टी पडली आहे का, हा येथे कळीचा मुद्दा बनला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे व कपिलदेव यांच्यानंतर सर्वाधिक बळी घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज बनण्यासाठी केवळ 5 बळींची आवश्यकता असताना अश्विनला वगळले गेले होते आणि त्यावेळी अश्विनने नाराजी व्यक्त केली होती. मंडळाला खेळाडूंनी जाहीरपणे अशी नाराजी व्यक्त करणे पसंत असत नाही, असे मानले जाते. त्याचा अश्विनला फटका बसत आहे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
अर्थात, आता अश्विन संघात नसल्याने खेळपट्टीला अधिक तडे पडू नयेत, अशी प्रार्थना विराटला करावी लागेल. कारण, असे तडे पडले तर त्याचा उत्तम विनियोग करुन इंग्लिश फलंदाजांना पेचात पाडण्यात माहीर असणार अश्विन यावेळी मैदानात नसेल! तो राखीव खेळाडूत बसलेला असेल!
भारताची दाणादाण…बिनबाद 28 ते 3 बाद 39
रोहित व राहुल यांनी प्रारंभी सावध सुरुवात केल्यानंतर भारताची एकवेळ बिनबाद 28 अशी स्थिती होती. पण, त्यानंतर रोहित, राहुल व पुजारा केवळ 10 षटकांच्या अंतरातच बाद होत गेले आणि पाहता पाहता भारताची 3 बाद 39 अशी दैना उडाली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
- फलंदाज संघ डाव धावा सरासरी
- सचिन तेंडुलकर भारत 782 34357 48.52
- कुमार संगकारा श्रीलंका 666 28016 46.77
- रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलिया 668 27483 45.95
- महेला जयवर्धने श्रीलंका 725 25957 39.15
- जॅक कॅलिस द. आफ्रिका 617 25534 49.10
- राहुल द्रविड भारत 605 24208 45.41
- विराट कोहली भारत 490 23003 55.28
सत्रनिहाय खेळावर दृष्टिक्षेप
- सत्र षटके धावा बळी सरासरी
- पहिले 26 54 3 2.16
- दुसरे 26 68 3 2.62
- तिसरे 27.3 122 7 4.44