नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व वरिष्ठ गोलंदाज इशांत शर्मा यांनी सोमवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत पहिला डोस घेतला. सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या विराटने इन्स्टाग्रामवर लसीकरणाचे छायाचित्र शेअर केले. इशांत व त्याची पत्नी प्रतिमा यांनीही लसीकरण केंद्रावर घेतलेला सेल्फी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केला.
‘लसीकरणाची मोहीम सुरळीत सुरु आहे, याचा वेशेष आनंद आहे. सर्वांनी शक्य तितक्या लवकर लसीकरण करवून घ्यावे’, असे ट्वीट इशांतने केले. भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, जलद गोलंदाज उमेश यादव व वरिष्ठ सलामीवीर शिखर धवन यांनीही यापूर्वी पहिला डोस घेतला आहे. तसेच चेतेश्वर पुजारा व त्याची पत्नी पूजा यांनीही सोमवारी पहिला डोस घेतला. भारतीय क्रिकेट संघ दि. 2 जून रोजी साडेतीन महिन्यांच्या इंग्लंड दौऱयावर जाणार असून ते 6 कसोटी सामने खेळणार आहेत. यात न्यूझीलंडविरुद्ध डब्ल्यूटीसी फायनलचा देखील आवर्जून समावेश आहे.