आयसीसी कसोटी मानांकन यादी- बुमराह, अश्विनचे मानांकन सुधारले, पदार्पणातील द्विशतकवीर काईलला 70 वे स्थान
दुबई / वृत्तसंस्था
आयसीसी कसोटी मानांकन यादीत फलंदाजांमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीची पाचव्या स्थानी घसरण झाली तर प्रतिस्पर्धी इंग्लिश कर्णधार जो रुट तिसऱया स्थानी झेपावला. गोलंदाजांच्या यादीत जसप्रित बुमराह व रविचंद्रन अश्विन या भारतीयांचे मानांकन सुधारले. पदार्पणात द्विशतक झळकावणारा विंडीजच्या काईल मेयर्सने पहिल्याच प्रयत्नात 70 व्या स्थानी झेप घेतली.
इंग्लंडविरुद्ध सलामीच्या कसोटी सामन्यात अनुक्रमे 11 व 72 धावा करणाऱया विराटच्या खात्यावर 852 गुण आहेत आणि बुधवारी जाहीर केल्या गेलेल्या ताज्या मानांकन यादीत तो एका अंकाने खाली घसरला. अनुभवी फिरकीपटू अश्विन व जलद गोलंदाज बुमराह अनुक्रमे सातव्या व आठव्या स्थानी झेपावले.
चेन्नई कसोटीत 227 धावांनी धमाकेदार विजय संपादन करुन देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱया रुटसमोर आता इंग्लंडला आयसीसी विश्व कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचवण्याचे लक्ष्य आहे. सध्या त्याच्या खात्यावर 885 रेटिंग गुण आहेत. त्याच्यासाठी फेब्रुवारी 2017 नंतर हे सर्वोच्च मानांकन आहे. लंकेविरुद्ध दोन व भारताविरुद्ध एक कसोटीत त्याने एकूण 684 धावा जमविल्या असून भारताविरुद्ध अजून तीन कसोटी होणार आहेत.
नोव्हेंबर 2017 नंतर विराटपेक्षा आघाडीचे स्थान प्राप्त करण्याची त्याची ही पहिलीच वेळ असून तो अव्वलस्थानावरील केन विल्यम्सनपेक्षा फक्त 36 गुणांनी व स्टीव्ह स्मिथपेक्षा फक्त 6 गुणांनी पिछाडीवर आहे. पहिल्या पाचमध्ये समाविष्ट असलेल्या लाबुशानेच्या खात्यावर 850 रेटिंग गुण आहेत.
पंतला 13 वे स्थान
भारतीय संघातर्फे ऋषभ पंतने पहिल्या डावात 91 धावांची खेळी साकारल्यानंतर 700 रेटिंग गुण मिळवले असून फलंदाजांच्या यादीत तो 13 व्या स्थानी आहे. सलामीवीर शुभमन गिलचे स्थान 7 अंकांनी सुधारले असून तो 40 व्या स्थानी पोहोचला तर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर 81 व्या स्थानी आहे. गोलंदाजात डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीम 85 व्या स्थानी आहे.
या ताज्या मानांकन यादीत इंग्लिश फलंदाज डॉम सिबलीचे मानांकनही सुधारले आहे. चेन्नईत 87 व 16 धावा जमवल्यानंतर तो 46 वरुन 35 व्या स्थानी पोहोचला आहे. गोलंदाजांच्या यादीत पॅट कमिन्स अव्वलस्थानी कायम असून जेम्स अँडरसन 6 वरुन तिसऱया स्थानी पोहोचला आहे. त्याचा राष्ट्रीय सहकारी स्टुअर्ट ब्रॉडपेक्षा तो फक्त 4 गुणांनी मागे आहे. आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप सुरु झाल्यानंतर अँडरसनचे हे सर्वोच्च मानांकन आहे. फिरकीपटू जॅक लीच व डॉमिनिक बेस हे आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 37 व्या व 41 व्या स्थानी पोहोचले.
काईलला पोचपावती
बांगलादेशविरुद्ध संस्मरणीत विजय मिळवून देणारा द्विशतकवीर काईल मेयर्स 448 रेटिंग गुणांसह 70 व्या स्थानी पोहोचला आहे. पदार्पणातच इतके रेटिंग गुण संपादन करणारा तो विंडीजचा पहिला व जागतिक स्तरावरली दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी 1903 मध्ये इंग्लंडच्या रे फोस्टर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत 287 धावांची धमाकेदार खेळी साकारत 449 गुण संपादन केले होते.
विंडीज कर्णधार क्रेग ब्रेथवेट फलंदाजात 53 व्या स्थानी पोहोचला तर जोमेल वॉरिकन (62) व रहकीम कॉर्नवाल (65) यांचे मानांकनही सुधारले आहे. बांगलादेशचा कर्णधार मोमिनूल हक 10 वे कसोटी शतक झळकावल्यानंतर 33 व्या स्थानी झेपावला. अष्टपैलू शकीब हसन फलंदाजांमध्ये 30 व्या स्थानी तर ऑफस्पिनर मेहदी हसन 28 वरुन 24 व्या स्थानी पोहोचला आहे.