आयसीसीची ताजी मानांकन यादी : चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांची मात्र घसरण,
दुबई / कर्णधार
भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसी कसोटी मानांकन फलंदाजांच्या यादीत आपले अव्वलस्थान कायम राखले तर चेतेश्वर पुजारा व अजिंक्मय रहाणे यांची मात्र घसरण झाली आहे. कोहली 928 गुणांसह दुसऱया स्थानावरील ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ अपेक्षा बराच पुढे आहे. स्मिथच्या खात्यावर सध्या 911 गुण आहेत. पुजारा 791 गुणांसह सहाव्या स्थानी तर रहाणे 759 गुणांसह नवव्या स्थानी फेकले गेले आहेत.
दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणारा जसप्रीत बुमराह गोलंदाजीत 794 गुणांसह सहाव्या स्थानी कायम असून फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (772 गुण) व मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमी (771 गुण) हे अनुक्रमे नवव्या व दहाव्या स्थानी आहेत. ऑस्ट्रेलियाचा नवोदित फलंदाज मार्नस लाबुशाने याने या यादीत कारकीर्दीतील सर्वोत्तम तिसरे स्थान प्राप्त केले आहे. 25 वर्षांचा हा फलंदाज यापूर्वी चौथ्या स्थानी होता. न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या कसोटीत 215 व 59 अशा धावांची आतषबाजी केल्यानंतर तो तिसऱया स्थानी झेपावला. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही सर्वाधिक धावांचा विक्रम त्याच्या खात्यावरच राहिला. मागील पाच कसोटीत त्याने 896 धावांची आतषबाजी केली आहे.
गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा स्पीडस्टार पॅट कमिन्स 904 गुणांसह आघाडीवर आहे. वॅग्नर 852 तर जेसॉन होल्डर 830 गुणांवर आहेत. ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज मिशेल स्टार्कने कारकिर्दीतील सर्वोत्तम पाचव्या स्थानी पोहोचण्याचा पुन्हा एकदा पराक्रम केला. यापूर्वी मार्च 2018 मध्येही तो पाचव्या स्थानी होता. या कसोटी मालिकेत त्याने एकूण 15 बळी घेतले आहेत. फिरकीपटू लियोनला दहा बळीमुळे चौदाव्या स्थानापर्यंत पोहोचता आले.
न्यूझीलंड साठी अष्टपैलू कॉलिन डे ग्रँडहोम फलंदाजांच्या यादीत 47 व्या स्थानावरून 39 व्या तर गोलंदाजी यादीत 36 व्या स्थानावरून 34 व्या स्थानी पोहोचला आहे मॅट हेन्रीचे मानांकन तीन अंकांनी सुधारले असून तो सध्या 65 व्या स्थानी पोहोचला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आपल्या कारकिर्दीत दुसऱयांदा फलंदाजांच्या यादीमध्ये पहिल्या दहामध्ये पोचला आहे. त्याने मागील लढतीत 47 व 72 धावांचे योगदान दिले. डॉम सिबलीने पहिलेच कसोटी शतक झळकावल्यानंतर या शतकामुळे तो 87 वरून 80 व्या स्थानी पोहोचला आहे जलद गोलंदाज जेम्स अँडरसन यांनी अलीकडे 28 व्यांदा डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला असून यामुळे तो पहिल्या दहामध्ये आला आहे सलामीवीर डीन एल्गार, एडन मॅरक्रम व ऍनरिच नोर्त्जे हे आफ्रिकन खेळाडू देखील मानांकनात पुढे झेपावले आहेत. या यादीत एल्गार 19 व्या, मॅरक्रम 22 व्या तर नोर्त्जे 62 व्या स्थानी आहे.