महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात –
यदुवीराच्या सहवासाने उषाचे कौमार्य नष्ट झाले होते. तिच्या शरीरावर अशी चिन्हे दिसू लागली होती की, जी कोणत्याही प्रकारे लपविली जाऊ शकत नव्हती. उषाही अतिशय आनंदी दिसत होती. पहारेकऱयांनी ते ओळखून बाणासुराकडे जाऊन सांगितले की, राजन, आपल्या राजकुमारीचे जे काही रंग-ढंग आम्ही पहात आहोत, ते आपल्या कुळाला बट्टा लावणारे आहेत.
दूत म्हणती प्रभो समर्था । तुलना नाहीं तव सामर्थ्या । कन्येचि दूषणें वृथा । केलें प्रभुत्वा तुमचिया । दुर्गम कन्यागारिं गुप्त । आम्ही रक्षकपुरुष नित्य । रक्षित असतां अपायरहित । केलें अद्भुत चरित्र हें । अपायरहित म्हणसी कैसें । अ÷ाw प्रहर विभागवशें। अतंद्रित जागृत घरटीमिषें । सावध आपैसे शस्त्रांस्त्रीं । ऐसे प्रमादरहित आम्ही । सावध रक्षित असतां स्वामी । विरुद्धाचरण कन्याधामीं । तें पाहूनि तुम्हीं नियमावें । कोणी दावू न शके बोटीं। दावितां पावे दु:खकोटी । ऐसिये मंदिरिं दुर्घटी । विरुद्ध राहटी प्रवर्तला । कोण्या मार्गें कोण्या योगें। कोण्या विचारें कोण प्रसंगें । दुष्टाचरण कवणासंगें । कन्येसि लागे हें न कळे । रक्षण करितां अपाय कांहीं। रक्षकापासूनि घडला नाहीं । सावध रक्षितां सर्वदाही । वृत्तान्त सर्वही तुम्हां कथितों । कार्यप्रसंगें प्रेरणेची । परम दुष्टा सखी जीची । तिचिया विरुद्धआचरणाची। क्रिया रक्षक नेणों आम्हे । रक्षकांचें ऐकूनि वचन । काय करिता झाला बाण । श्रोतीं होवोनि सावधान । तें संपूर्ण परिसावें ।
रक्षक बाणासुराला पुढे म्हणाले-हे प्रभो, सावधपणे आम्ही महालावर पहारा देत असतो. आपल्या कन्येला बाहेरचा मनुष्य पाहूसुद्धा शकत नाही. असे असता ही कलंकित कशी झाली, कळत नाही.
स्वकन्येचें दुष्टाचरण । ऐकोनि हृदयीं खेंचला बाण ।
त्यानंतरें कन्यासदन । शीघ्र आपण प्रवेशला ।
कन्यगारिं अकस्मात । सक्रोध बाण झाला प्राप्त ।
तंव तो देखतां झाला तेथ । वीर समर्थ युदुत्तम ।
यासवांमाजी धुरंद्र । अनिरुद्ध नरवर्ष सुन्दर ।
स्वकन्येती क्रीडागर । देखे असुर तें ऐका ।
आपल्या कन्येचा कलंक ऐकून बाणासुराला अतिशय वाईट वाटले. तो ताबडतोब उषेच्या महालात जाऊन पाहतो, तर तेथे अनिरुद्ध.
काम केवळ जो अनंग। कृष्णवीर्यें तो झाला साङ्ग। तो कामात्मज लावण्यलिङ्ग । अपर अव्यंग निवडला। ब्रह्माण्डभुवनसुंदर एक । अपर तुलना न पवे पुरुष । श्याम मनोहर राजीवाक्ष। विशाळ बाहु सुपीन सरळ । कुण्डलमंडित गंडयुगल । तद्भारंजित सुतेजाळ । श्रवणीं कुन्तळ झळकती ।किरीट माथां रत्नखचित । कंठाभरणें पदकान्वति। अंगदें कटकें मुद्रिकायुक्त । मेखळांमंडित भूषाढय़। कनकाम्बर कशिलें कासे । वदन चंद्रासमान भासे । सस्मित कटाक्षें लक्ष्मी विलसे । अपाङ्गमोक्षें प्रस्फुरित । नवयौवन ठाणठकार । ऐसियातें वाणासुर । देखता झाला क्रीडापर । तें सविस्तर अवधारा ।