विराट-अनुष्काचा रोमँटिक अंदाज : पाणीपुरीसह विविध पदार्थांची मेजवानी, आनंदी राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणुमळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असले तरी या कठीण काळातही काही लोकांनी स्वत: ला आनंदी ठेवण्याचे निरनिराळे मार्ग शोधले आहेत. या परिस्थितीत काही लोक रामायण, महाभारत सारख्या मालिका पाहून आनंदित होत आहेत तर काही पेंटिग, कुकिंग करत स्वत:च्या कुटुंबियासोबत चांगला वेळ घालवत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे कपलही लॉकडाऊनमध्ये वेगळय़ाच अंदाजात आहेत. सोमवारी विराटने पत्नी अनुष्कासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. याशिवाय, या कपलने लॉकडाऊन दरम्यान सर्व नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला.
सध्याच्या घडीला नवी दिल्लीत लॉकडाऊनमुळे अनुष्का, विराटसमवेत आई-वडिलांच्या घरीच आहेत. अशा परिस्थितीत अनुष्का सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत आहे. गत आठवडय़ात तिने वडिलांच्या वाढदिवशी चॉकलेट केक तयार केला होता, याचा फोटो अनुष्काने ट्विटरवर शेअर केला होता. यानंतर, सोमवारी विराटने अनुष्कासोबत एक रोमँटिक फोटो शेअर केल्यानंतर अल्पावधीत या फोटोला मोठय़ा प्रमाणात लाईक्स मिळाल्या आहेत. या फोटोलाही त्याने साजेशी कॅप्शन देताना जीवनात खरोखर काय महत्वाचे आहे याचे ज्ञान असणे हा एक आशिर्वाद आहे, असा एक महत्वपूर्ण संदेश दिला आहे. या फोटोमध्ये या दोघांशिवाय एक डॉगीही दिसत आहे. विशेष म्हणजे, क्रिकेटच्या मागील काही वर्षातील व्यस्त वेळापत्रकानंतर कोरोनामुळे विराटला मोठी सुट्टी मिळाली आहे. यामुळे सध्या हे कपल एकमेकांना भरपूर वेळ देत आहे. रोज नवीन अंदाजात हे कपल सोशल मीडियावर दिसत आहे.
पाणीपुरीसह निरनिराळय़ा पदार्थांची पर्वणी
अनुष्काचे सोशल मीडियावर लाखो फॅन आहेत. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळात अनुष्का रोज काही नवीन डिशचा फोटो शेअर करते. रविवारी अनुष्काने पाणी पुरी आणि पनीर मखनवाला डिशचा फोटो शेअर केला आहे. ते तिच्या आईने घरी बनवले असल्याचे ट्विट तिने केले. याशिवाय, या लॉकडाऊनच्या काळात ती आपल्या घरातील सदस्यांसह मोनोपोली खेळत होती. कुटुंबियासोबत विराट व अनुष्का लॉकडाऊनमधील सुट्टीचा चांगलाच आनंद घेत असल्याचे पहायला मिळत आहे. देशात कोरोना महामारीचे संकट गडदमय होत असताना या जोडीने देखील पंतप्रधान सहायता व महाराष्ट्र राज्य सरकारच्या निधीसाठी मदत केली आहे. विशेष म्हणजे, या जोडीने केलेली मदत ही जाहीर करण्यात आलेली नाही.