प्रतिनिधी/ पणजी
जिल्हा पंचायत निवडणुकीत दक्षिण गोवाही पादाक्रांत करीत भाजपने दोन्ही जिल्हा पंचायतींवर निर्विवाद बहुमत मिळवले. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मगो पक्षालाही दणका बसला असून अपक्षांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. ‘आप’ने प्रथमच खाते उघडले. काँग्रेसने पराभव स्वीकारला आहे. भाजपचे दोन्ही जिल्हा पंचायतीवर स्वतःचे बळ वाढले आहे.
उत्तर गोव्यात 25 पैकी 19 तर दक्षिण गोव्यात 25 पैकी 15 जागांवर भाजपने विजय प्राप्त केला आहे. 48 जाणांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 33, काँग्रेसने केवळ 4, मगोने 3, अपक्ष 7 जागांवर तर आप व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी गोमंतकीय जनतेचे आणि भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. 2022 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी हा मोठा विजय मानला जातो.
शनिवारी दि. 12 डिसेंबर रोजी गोव्यात दोन जिल्हा पंचायतींसाठी निवडणुका झाल्या. एकूण मतदान जवळपास 57 टक्के झाले. काल सोमवारी सकाळी राज्यातील 15 ठिकाणी मतमोजणीला प्रारंभ झाला.
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यालाही भाजपने पाडले खिंडार
सुरुवातीचे निकाल हे भाजपच्या विरोधात जात होते मात्र दुपारी एकेक येणारे निकाल हे भाजपच्या बाजूने लागण्यास प्रारंभ झाला आणि सांयकाळी काही धक्कादायक व अनपेक्षित निकाल लागले. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यालाही भाजपने खिंडार पाडले. दक्षिण गोव्यात दवर्ली, गिर्दोली, बार्से, खोल, रिवण इत्यादी अनेक मतदारसंघात जनतेने भाजपवर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट केले.
सत्तरी, तिसवाडी तालुक्यात भाजपचेच वर्चस्व
उत्तर गोव्यातील सत्तरीच्या तिन्ही मतदारसंघात भाजप सदस्य विजयी झाले. तिसवाडी तालुक्यात सेंट लॉरेन्स, ताळगाव, चिंबल, खोर्ली या 5 पैकी 4 मतदारसंघात भाजपने बाजी मारली. पेडणे तालुक्यातील मांद्रेमध्ये भाजपला जोरदार धक्का बसला. दोन्ही मतदारसंघांवर अपक्षांनी विजय मिळवला तर पेडणे मतदारसंघामध्ये धारगळमध्ये भाजपला निसटता विजय प्राप्त झाला. तोरसेमध्ये देखील विजय प्राप्त करून उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
बार्देश तालुक्यात भाजपला घवघवीत यश
बार्देश तालुक्यात भाजपने घवघवीत यश प्रात केले. शिरसई, शिवोली, हळदोणे, हळजुणे, रेईश-मागुश व कळंगुट या 8 पैकी 6 मतदारसंघात भाजपचे सदस्य विजयी झाले. उत्तर गोव्यात मगो एकाही मतदारसंघात खाते उघडू शकला नाही. काँग्रेस पक्षाची तर वाताहातच झाली.
डिचोलीतही केले विरोधकांना चारी मुंडय़ा चित
डिचोली तालुक्यातही भाजपने बाजी मारली. 4 मतदारसंघांपैकी प्रतिष्ठेच्या लाटंबारसे मतदारसंघात नरेश सावळ व सभापती राजेश पाटणेकर यांचा पाठिंबा मिळवून देखील भाजप उमेदवाराचा पराभव झाला. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील पाळी जिथे सर्वाधिक मतदान झाले त्याठिकाणी भाजपने प्रचंड मतांनी विजय प्राप्त केला. कारापूर-सर्वण, मये व पाळीमध्ये भाजपने विरोधकांना चारही मुंडय़ा चित केले.
दक्षिणेत सर्वसमावेश निकालातही भाजपची बाजी
दक्षिण गोव्यातील 25 पैकी 23 ठिकाणी मतदान झाले होते. सांकवाळ येथे भाजपच्या अनिता थोरात बिनविरोध विजयी झालेल्या तर नावेलीतील काँग्रेस उमेदवाराच्या निधनाने निवडणुक स्थगित झाली. दक्षिण गोव्यातील सर्वांचे लक्ष वेधून राहिलेल्या सालसेतमधील काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातही काँग्रेस फारशी प्रगती करू शकली नाही. नुवे, कुडतरी, वेळ्ळी या केवळ तीनच मतदारसंघात काँग्रेसने विजय प्राप्त केला. तर दवर्ली येथे भाजपने व चर्चिलच्या बाणावलीत ‘आप’ने विजय प्राप्त केला. कोलवा येथे राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला.
बाबू कवळेकरांचा काँग्रेसला फटका, भाजपला फायदा
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या भाजपमध्ये जाण्याचा फटका काँग्रेसला बसला व भाजपला घवघवीत यश प्राप्त झाले. सांगे व केपे तालुक्यात भाजपनेच यश मिळवले.
फोंडय़ात काँग्रेसचा भोपळा, भाजप-मगो समसमान
फोंडा तालुक्यात काँग्रेसने भोपळा फोडला. या तालुक्यात 6 पैकी 3 ठिकाणी भाजपने तर कवळे, प्रियोळ व कुर्टी मतदारसंघात मगो विजयी झाला. भाजपला बेतकी-खांडोळा, शिरोडा व बोरी या तीन मतदारसंघात विजयी प्राप्त झाला.
काणकोणातील दोन्ही जागा भाजपच्या ताब्यात
काणकोण तालुक्यात काँग्रेस खाते खोलू शकले नाही. दोन्ही ठिकाणी भाजपने विजय प्राप्त केला. मुरगाव तालुक्यातील नुवेमध्ये काँग्रेसने, कुठ्ठाळीत अपक्ष तर सांकवाळ मध्ये भाजपच्या अनिता थोरात या पूर्वीच बिनविरोध विजयी झालेल्या आहेत.
कोरोना, मतपत्रिका असूनही जलदगतीने मतमोजणी
कोविडच्या प्रभावाखाली विविध नियम आणि अटी पाळून मतमोजणी हाती घेतली जाणार असल्याने मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालेल असा अंदाज होता परंतु दुपारी 12 पर्यंत जवळपास 15 मतदारसंघांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले. मतमोजणी ही मतपत्रिकाद्वारे झाली होती तरी देखील वेळेवरच ती संपुष्ठात आली. हा कौतुकाचा विषय ठरला. जनतेमध्ये मतमोजणीबाबत कमालीची उत्सुकता होती.
‘आप’ने खाते उघडले
बाणावलीतून हेंझल फर्नांडिस विजयी
आम आदमी पक्षाने दक्षिण गोव्यातील बाणावली मतदारसंघात विजय संपादन केला असून राज्यात एक जागा पटकावून खाते उघडले आहे. हेंझल फर्नांडिस असे त्या विजयी उमेदवाराचे नाव आहे. हा विजय ‘आप’साठी विशेष असून ही आता सुरुवात आहे. ‘आप’ यापुढेही विविध विषय घेऊन जनतेचे प्रश्न मांडण्याचे काम करीत राहणार असल्याचे ‘आप’चे प्रवक्ते राहुल म्हांबरे यांनी सांगितले. बाणावली येथूनच ‘आप’ने गोव्यातील पहिल्या जाहीर सभेची सुरुवात केली होती आणि तेथेच पक्षाला पहिला विजय मिळाला, अशी माहिती म्हांबरे यांनी दिली.
अरविंद केजरीवाल यांच्याकडून हेंझल फर्नांडिस यांचे अभिनंदन
आम आदमी पक्षाचे विजयी उमेदवार हेंझल फर्नांडिस यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी फोन करुन त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. हा विजय ‘आप’साठी महत्त्वाचा, उत्साहवर्धक असून गोमंतकीय जनतेच्या अपेक्षा वाढणार आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी ‘आप’ने गोव्यात कार्य करावे. आज ना उद्या विजय मिळेल, असे केजरीवाल यांनी नमूद केले.
राजस्थाननंतर भाजपला गोव्यातही घवघवीत यश
गोव्यातील जिल्हा पंचायतीकडे भाजपने राष्ट्रीय पातळीवर फार गांभिर्याने घेतले नव्हते. मात्र स्थानिक पातळीवर भाजप नेत्यांनी विरोधकांना गाफील ठेवले आणि अचानक जिल्हा पंचायत निवडणुकीचे मतदानाची तारीख जाहीर केली. कोळसा विरोधी आंदोलन, रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या विरोधात आंदोलन, सत्तरीतील मेळावली आयआयटी विरोधात वातावरण असून सत्ताधारी भाजपने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत घवघवीत यश प्राप्त केले. सत्तेसाठी दोन्ही ठिकाणी किमान 13 सदस्यांची आवश्यकता असते त्याही पेक्षा जास्त सदस्य भाजपच्या वाटय़ाला आले आहेत. विरोधकांचा धुव्वा उडवित भाजपने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक जिंकलेली आहे. राजस्थाननंतर भाजपने हा चांगला विजय प्राप्त केला.