सभापतींच्या दिशेने फेकले पुस्तक : मार्शलांच्या टोप्या हिसकावल्या : कामकाज तीनवेळा झाले तहकूब
प्रतिनिधी /पणजी
अत्यंत महत्वाची विधेयके प्रचंड घाईगडबडीत मतदानास घालून अल्पकाळात मंजूर करण्याच्या सरकाच्या प्रयत्नांचा निषेध म्हणून विरोधकांनी काल शुक्रवारी विधानसभागृहात अभूतपूर्व असा गोंधळ घातला. या गोंधळात विरोधकांनी सभागृहातील मार्शलच्या डोक्यावरील टोप्या हिसकावून घेत त्या सभापतींच्या अंगावर फेकल्या, तसेच सभागृहाच्या रिपोर्टिंग टेबलवर असलेली काही पुस्तके उचलून सभापतींच्या दिशेने फेकण्याचाही प्रकार घडला. मात्र मार्शलनी ती पुस्तके हवेतच झेलल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
एका बाजूने विरोधक गोंधळ घालत होते. ’उद्धवा अजब तुझे सरकार’, ’रघुपती राघव राजाराम…’ यासारखी गाणी सादर करत सरकारचा निषेध करत होते तर दुसऱया बाजूने त्याच गडबड-गोंधळात सभापती राजेश पाटणेकर हे अत्यंत गतीने एकामागून एक विधेयके मतदानासाठी घेत होते. असे ’न भूतो’ चित्र सभागृहात दिसून आले.
सरकारचा निषेध करत विरोधकांचा सभात्याग
या विरोधकांना आवरणे मार्शलना शक्य होत नसल्याचे पाहून पोलीस सुरक्षा रक्षकांना (एटीएस) पाचारण करण्यात आले. मात्र त्यानंतर विरोधकांनी सरकारचा जोरदार निषेध व घोषणाबाजी करत सभात्याग केला.
अकरा विधेयके मांडायची होती सभागृहात
शुक्रवारी एकूण 11 विविध विधेयके सभागृहात मांडण्यात येणार होती. त्यातील काही नवीन तर काहीं दुरुस्तीसाठी होती. विधानसभेचा काल तिसरा आणि शेवटचा दिवस होता. सायंकाळी 4.30 पर्यंतसुद्धा लक्षवेधी सूचनांवरच चर्चा सुरू होती. त्यात सर्वात महत्वाची लक्षवेधी सूचना गत आठवडय़ातच आलेल्या महापूरासंबंधी होती. त्यामुळे एवढय़ा महत्वाच्या विषयावर मर्यादित वेळेत चर्चा करणे शक्यच नाही असे विरोधकांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिले.
लक्ष्यवेधी सूचना टाळल्याने विरोधक खवळले
सभापतींनी काही लक्षवेधी सूचना चर्चेस घेणेच टाळले आणि विधेयके मांडण्याचा आदेश दिला. त्यातून विरोधक खवळले व त्यांनी सभापतींच्या आसनाच्या दिशेने चाल केली. तेथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मार्शलच्या टोप्या, पुस्तके अशा वस्तू सभापतींच्या अंगावर फेकण्यात आल्या. त्याच संतापाच्या भारात सर्वांनी सभात्याग केला.
विरोधकांकडून सभापतींवर प्रश्नांची सरबत्ती
राज्य हित आणि लोकांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशी विधेयके मंजुरीसाठी येणार होती. त्यामुळे त्यावर सखोल व व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे, चर्चेविना अशी विधेयके मंजूर करता येणार नाहीत, असे विरोधकांचे म्हणणे होते. अशाप्रकारे घाईगडबडीत विधेयके मंजूर करण्यामागे कारण काय? कुठे आग लागली आहे का? ही विधेयके आजच मंजूर नाही झाली तर राज्याचे नुकसान होणार आहे का? यासारखे अनेक सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले.
विरोधकांच्या गोंधळातच रघुपती राघव राजाराम…
विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणाऱया प्रश्नांमुळे सभागृहात प्रचंड गदारोळ माजला. सर्व विरोधक सभापतींच्या आसनावर चाल करून गेले. सुदिन ढवळीकर यांनी त्यावेळी रघुपती राघव राजाराम… हे गाणे गायला सुरूवात केली. अन्य सर्वांनी त्यांच्या सुरात सूर मिळविला व मोठय़ा आवाजात गाणे सादर केले. तेव्हा सभापतींनी प्रथम 15 मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले.
विरोधकांनी मार्शलच्या टोप्या उडविल्या सभापतींवर केला पुस्तकांचा मारा
कामकाज पुन्हा सुरू होताच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रतापसिंग राणे, लुईझिन फालेरो, रवी नाईक, आलेक्स लॉरेन्स, जयेश साळगावकर, विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकर, विनोद पालयेकर, प्रसाद गांवकर, रोहन खंवटे, आदी विरोधक पुन्हा सभापतींच्या आसनावर चाल करून गेले व पुन्हा मोठा कोलाहल माजला. मार्शलच्या टोप्या, पुस्तके, सभापतींच्या अंगावर फेकण्यात आली. मात्र त्यावेळी सभापतींनी कुणाचीही पर्वा केली नाही व कामकाज सुरूच ठेवले. सर्व विधेयके एकामागोमाग मतदानासाठी घेण्यात आली. मात्र तोपर्यंत सर्व विरोधक सभात्याग करून निघून गेले होते.
विरोधकांची कृती अशोभनीयच ः मुख्यमंत्री विधानसभेसारख्या अत्यंत पवित्र स्थळी विरोधकांनी केलेली कृती अशोभनीय होती, अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निंदा केली. विरोधकांपैकी बहुतेक सदस्य हे वरिष्ठ आहेत. काहीजण तर 25 ते 50 वर्षांपासून विनाखंड विधानसभेत येत आहेत. सभागृहाचे कायदे, नियम यांची त्यांना पूर्ण जाण आहे. त्यामुळे सभागृहात कसे वागावे याचे ज्ञान त्यांना असायला हवे. परंतु अशा ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्यांकडून झालेली कृती खरोखरच अशोभनीय होती, अशी खेदजनक भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.