कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर घेतील भेट
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी राज्यपाल सत्यपाल मलीक यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली आणि विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
कोरोना वाढत्या फैलावामुळे गोमंतकीय जनता भयभीत झाली असून संभ्रमात पडली आहे. राज्यातील विविध ठिकाणी रुग्ण वाढत असल्याने जनतेत चिंता निर्माण झाली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारकडे कोणताही आराखडा तयार नाही. आरोग्य खाते, आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री व संबंधित इतर खात्यांच्या उलटसुलट विधानांमुळे जनतेमध्ये गैरसमज पसरत असल्याचे आमदार कामत यांनी राज्यपालांना सांगितले.
कोविड हॉस्पिटल तसेच केअर सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णांना योग्य ते उपचार व आहार मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्याचे फोटो, व्हिडीओ प्रसार माध्यमातून उघड होत असून याची दखल घ्यावी, अशी मागणी आमदार कामत यांनी राज्यपालांकडे केली आहे.
सध्या गोव्यात 1417 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांना क्वारंटाईन ठेवण्यासाठी पुरेसे बेड नाहीत. अनेकांचे कोरोना चाचणी अहवाल वेळेवर मिळत नाहीत तर काहींना त्यांचे अहवाल मिळण्याआधिच कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात येत. नंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह येतात. तथापि, पॉझिटिव्ह रुग्णांमुळे निगेटिव्ह रुग्णांना बाधा होऊ शकते, असे आमदार कामत यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पूर्ण क्षमतेने कार्यन्वित करावे, संपूर्ण राज्यात मोठय़ा प्रमाणात कोरोना चाचणी करावी, दोन्ही जिल्हय़ात स्वतंत्र कोविड हॉस्पिटल करावे तसेच प्रत्येक तालुक्यात कोविड सेंटर सुरु करावे, खासगी इस्पितळातील आयसीयूमधील 20 टक्के बेड राखून ठेवण्याचा आदेश मागे घ्यावा, अशा अनेक मागण्या आमदार कामत यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत. कोविड तसेच आर्थिक परिस्थितीवर श्वेतपत्रिका जारी करावी व कृती आराखडा तयार करा, म्हादईप्रश्नी जागृत रहावे, संजीवनीचा निर्णय सर्वांनी विश्वासात घेऊन करावा, असे आमदार कामत यांनी निवेदनात नमुद केले आहे.