ऑनलाईन टीम / ढाका :
बांगलादेशमधील मुस्लिम धर्मगुरू आणि चर्चेत असलेल्या मौलवीने फेसबुकवरील ‘हाहा’ इमोजीचा वापर करणाऱ्यांविरोधात एक फतवा जारी केला आहे.
शनिवारी, मौलानाने तीन मिनिटांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि फेसबुकवर लोकांकडून होत असलेल्या उपहासावर टीका केली. त्यानंतर या मौलवीने फतवाच जारी केला. फेसबुकवर हाहा इमोजीचा वापर इस्लामविरोधी असल्याचेही त्यांनी सांगितले.
- तर इस्लामच्यादृष्टीने हे ‘हराम’
मौलवी अहमदुल्लाहने सांगितले की, तुम्ही केवळ थट्टा उडवण्यासाठी हाहा इमोजीचा वापर करत असाल आणि कंटेट पोस्ट करणाऱ्या युजर्सचाही तोच उद्देश्य असेल तर ठीक आहे. मात्र, एखाद्या युजरची थट्टा उडवण्यासाठी कोणी हाहा इमोजीचा वापर करत असेल, तर इस्लामच्यादृष्टीने हे ‘हराम’ असल्याचे त्यांनी सांगितले. कोणाचीही थट्टा उडवण्यासाठी हाहा इमोजीचा वापर करू नका असे आवाहनही मौलवीने केले आहे.
- अनेकांनी केले समर्थन
हा व्हिडिओ 20 लाखांहून अधिकजणांनी पाहिला आहे. मौलानाच्या या व्हिडिओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया नोंदवली आहे. बहुतांशी जणांनी यावर सकारात्मक टिप्पणी केली आहे. तर, अनेकजणांनी ‘हाहा’ इमोजीचा वापर करून या व्हिडिओवरचीही थट्टा उडवली.
अहमदुल्लाह हे बांगलादेशमधील नव्या पिढीचे मौलवी समजले जातात. सोशल मीडियावर ते सक्रिय आहेत.मौलाना अहमदुल्लाह यांचे फेसबुक आणि युट्युबवर 30 लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. टीव्ही वृत्तवाहिनीवरील धार्मिक मुद्यांच्या असलेल्या चर्चेत ते सहभागी होत असतात.