मंगळवारी पहाटे देवीचे अग्निदिव्य मार्गक्रमण : 13 दिवशीय शिमगोत्सवाची होणार सांगता : होमकुंड रचण्याचे काम पूर्ण.
प्रतिनिधी /डिचोली
विर्डी सांखळी येथील कळसोत्सवानंतर प्रसिद्ध होमकुंड उत्सव आज दि. 28 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या गावच्या 13 दिवशीय शिमगोत्सवाची मंगळवारी पहाटे श्री सातेरी शांतादुर्गा देवीच्या कळसाने अग्निदिव्य मार्गक्रमण केल्यानंतर सांगता होणार आहे. गावात होळी रोहण केल्यानंतर नवव्या दिवशी विर्डी गावातील श्री सातेरी शांतादुर्गा देवीचा कळस गावातील लोकांच्या घरांना भेटी देण्यासाठी बाहेर पडतो. चार दिवस घराघरांमध्ये भेटी दिल्यानंतर चौथ्या दिवशी होमकुंड उत्सव साजरा केला जातो. .
गेल्या शुक्रवारी रोजी संध्याकाळी देवीचा कळस महादेव मंदिरातून बाहेर काढण्यात आला होता. तीन दिवस गावातील विविध वाडय़ांवर भाविकांच्या घरांमध्ये भेटी दिल्यानंतर आज चौथ्या दिवशी देवीचा कळस सकाळी धाटवाडा येथील घरांना भेटी देणार. सायंकाळी च्यारीवाडा येथील घरांना भेटी देऊन झाल्यानंतर तेथे कौलोत्सव होणार आहे. त्यानंतर घाडीवाडा येथील घरांना भेटी दिल्यानंतर तेथेही कौलोत्सव होणार आहे. तत्पूर्वी घाडीवाडा येथे जाताना वाटेत व्याघ्रेश्वर देवाला देवी कौल देणार. घाडीवाडा येथे कौल दिल्यानंतर रात्री कळस भाटातून या पारंपरिक वाटेने महादेव मंदिराजवळ येणार. येथे रचून ठेवण्यात आलेल्या होमकुंडाला वळसा घालून देवीचा कळस देऊळवाडा येथील घरांना भेटी देणार.
येथील घरांना भेटी दिल्यानंतर वाजत गाजत सर्व व्रतस्थ धोंडगणांच्या साथीने कळसाला होमकुंडस्थळी आणले जाणार. होमकुंडाला प्रदक्षिणा घालून देवी होमकुंडाला अग्नी देणार व सर्व धोंडगण कळसासह सातेरी शांतादुर्गा मंदिराजवळील तळीवर स्थानासाठी जाणार. पहाटे सर्वप्रथम सर्व धोंडगण व नंतर देवीचा कळस डोक्मयावर घेतलेला मोडपुरुष होमकुंड मार्गक्रमण करणार व नंतर महादेव मंदिराच्या मंडपात सामूहिक कौलोत्सव होऊन देवीचा कळस पूर्ववत मंदारात प्रवेश करणार. त्यानंतर उत्सवाची सांगता होणार आहे.