गोडोली / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी कमी झाली असली तरीही अजूनही संसर्गाची धास्ती आहे. संसर्ग रोखण्यासाठी सध्या तरी प्रतिबंधक लस हाच एक पर्याय उपलब्ध आहे. विलासपूर, गोडोलीतील नागरिकांसाठी जुन्या ग्रामपंचायत इमारतीत आजपासून (दि.16) पासून लसीकरण केंद्र सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी 130 नागरिकांना लस देण्यात आली.
शहरात मर्यादित लसीकरण केंद्र आणि लस उपलब्ध होत असल्याने केंद्रावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत आहे. याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे नव्याने लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत आग्रह धरला होता. आमदारांच्या प्रयत्नातून आरोग्य विभागाच्या सहकार्याने विलासपूर, गोडोली परिसरातील नागरिकांसाठी बुधवार दि.16 जूनपासून नव्याने लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी 130 नागरिकांनी दुसरा डोस घेतला. अतिशय शिस्तबद्ध आणि शासनाने घालून दिलेल्या निर्देशानुसार सकाळी 10 पासून डॉ. अमर शेलार, डॉ. अमोल पाटील, वैद्यकीय सहाय्यक अनिता आनंदे, रेखा माळके, नजराना बागवान, सोनाली चव्हाण, साहील आनंदे यांनी लसीकरण देण्यासाठी योगदान दिले.यावेळी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाचे अध्यक्ष समाजसेवक फिरोजभाई पठाण, पारीख काका, बाळासाहेब महामुलकर, अभय जगताप, निरंजन कदम, प्रकाश पाटील, मिनिष सावंत, आदी कार्यकर्ते नागरिकांना सहकार्य करत होते.