वृत्त संस्था/ दुबई
न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यम्सन आणि अष्टपैलू मार्क चॅपमन यांना स्नायू दुखापत झाल्याने येथे शनिवारी होणारी हॉलंडविरूद्ध सराव सामन्यांतून त्यांनी माघार घेतल्याचे न्यूझीलंडच्या संघ व्यवस्थापनाने जाहीर केले आहे.
आयसीसीच्या आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी प्रत्येक संघाला सरावाचे सामने खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. न्यूझीलंड आणि हॉलंड यांच्यात सरावाचा सामना होत आहे.
खबरदारी म्हणून विल्यम्सन-चॅपमन यांनी या सराव सामन्यासाठी आपण उपलब्ध होत नसल्याचे कळविले आहे. विल्यम्सनला ही दुखापत गेल्या गुरूवारी झाली होती. या दुखापतीचे स्वरूप गंभीर नसल्याचे सांगण्यात आले आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडचा सलामीचा सामना पाकविरुद्ध 26 ऑक्टोबरला होणार आहे. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला रविवार दि. 24 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे.