वृत्तसंस्था/ माऊंट माँगेनुई
शनिवारपासून येथे सुरू झालेल्या पाकविरुद्ध पहिल्या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर यजमान न्यूझीलंडने आपल्या डावाला सावध सुरुवात करताना 3 बाद 222 धावा जमविल्या. कर्णधार विल्यम्सन 94 धावावर खेळत असून रॉस टेलरने 70 धावांचे योगदान दिले.
या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. वेगवान गोलंदाजीला अनुकूल असलेल्या बे ओव्हलच्या खेळपट्टीवर पाकच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीला चांगलाच फायदा उठविला.
डावातील पहिल्या षटकातील तिसऱया चेंडूवर शाहीन आफ्रिदीने न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज लेथमला अझहर अलीकरवी झेलबाद केले. त्याने 4 धावा जमविल्या. शाहिन आफ्रिदीने न्यूझीलंडला आणखी एक धक्का देताना ब्लंडेलला 5 धावावर बाद केले. न्यूझीलंडची यावेळी स्थिती 2 बाद 13 अशी होती. विश्रांतीनंतर पुन्हा संघात पुनरागमन करणाऱया कर्णधार विलियमसनने रॉस टेलरसमवेत संघाचा डाव सावरताना तिसऱया गडय़ासाठी 120 धावांची भागीदारी केली.
शाहिन आफ्रिदीने न्यूझीलंडची ही जोडी फोडण्यात यश मिळविले. त्याने रॉस टेलरला झेलबाद केले. टेलरने 70 धावा जमविल्या. कर्णधार विलियमसन आणि निकोल्स यांनी चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 89 धावांची भागीदारी केली आहे. कर्णधार विलियमसन आपल्या कसोटीतील 23 व्या शतकाकडे वाटचाल केली असून तो 94 धावावर खेळत आहे. निकोल्स 42 धावावर खेळत आहे. 87 षटकात न्यूझीलंडने 3 बाद 222 धावापर्यंत मजल मारली. पाकतर्फे शाहिन आफ्रिदीने 55 धावात 3 गडी बाद केले.
या सामन्यावेळी एका विक्षिप्त क्रिकेट चाहत्याने मैदानात प्रवेश करत विल्यम्सनशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला. या स्ट्रिकरच्या अडथळय़ामुळे काही मिनिटांचा खेळ वाया गेला. सुरक्षा अधिकाऱयांनी या व्यक्तीला मैदानाबाहेर काढल्यानंतर पुन्हा खेळाला प्रारंभ झाला. आयसीसीच्या कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत दोन सामन्यांची ही कसोटी मालिका खेळविली जात आहे.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड प. डाव : 87 षटकात 3 बाद 222 (विल्यम्सन खेळत आहे 94, निकोल्स खेळत आहे 42, रॉस टेलर 70, लेथम 4, ब्लंडेल 5, शाहिन आफ्रिदी 3-55).