नोबेलविजेत्याने बालपणीच्या मित्रासोबत विवाह
वृत्तसंस्था/ लंडन
पाकिस्तानी कार्यकर्ती आणि नोबेल शांतात पुरस्कार विजेती मलाला यूसुफजईने (24 वर्षे) ब्रिटनमध्ये विवाह केला आहे. असर नावाच्या व्यक्तीसोबत मलाला विवाहबद्ध झाली आहे. मलालाने सोशल मीडियावर स्वतःच्या विवाहाची छायाचित्रे शेअर केली आहेत.
आज माझ्या जीवनाचा एक अनमोल दिवस आहे. असर आणि मी जीवनभरासाठी परस्परांची साथ निभावण्यासाठी विवाहबंधनात बांधले गेलो आहोत. आम्ही पुढील वाटचाल एकत्रितपणे करण्यासाठी उत्साही आहोत असे मलालाने नमूद केले आहे.
मुलींच्या शिक्षणाच्या बाजूने आवाज उठविणारी मलाला मूळची पाकिस्तानच्या स्वात खोऱयातील रहिवासी आहे. 9 ऑक्टोबर 2012 रोजी स्कुलबसमध्ये जाताना तालिबानने मलालावर गोळय़ा झाडल्या होत्या. तेव्हा तिचे वय केवळ 15 वर्षे होते. गंभीर प्रकृती पाहता मलालाला उपचारासाठी ब्रिटनमध्ये आणले गेले. तेथे शस्त्रक्रियेनंतर तिचा जीव वाचू शकला होता. ब्रिटनमधील पाकिस्तानी दूतावासात तिच्या वडिलांना नोकरी देण्यात आली.
‘आय ऍम मलाला’ आत्मकथा
मुलींच्या शिक्षणाची समर्थक मलालाने ‘आय ऍम मलाला’ नावाने आत्मकथा लिहिली आहे. याकरता तिला 3 दशलक्ष डॉलर्स मिळाले होते. या आत्मकथेचे प्रकाशन ब्रिटनमधील विन्डेनफेल्ड अँड निकोलसन या कंपनीने केले होते.
ऑक्सफोर्डमधून पदवीधर
2014 साली लंडनमध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया झाली, ज्यानंतर ती कुटुंबासमवेत बर्मिंगहॅम येथे स्थलांतरित झाली होती. मुलींच्या सहाय्यासाठी तिने मलाला फंड नावाचा चॅरिटी सुरू केला. मलालाने मागील वर्षी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून राजकारण, अर्थशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मलालाला 2014 मध्ये शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.