दक्षिण कोरियातील अजब प्रकार
जगात असे अनेक देश आहेत, जेथे अजब-विचित्र नियम आणि कायदे आहेत. आतापर्यंत तुम्ही फ्लॅट, घर किंवा इलेक्ट्रॉनिक सामग्री भाडेतत्वावर घेण्याची बाब ऐकली असेल. पण एका ठिकाणी माणूस देखील भाडेतत्वावर मिळतो. हा प्रकार तुम्हाला विचित्र वाटत असला तरीही हेच सत्य आहे. या जगात एक असा देश आहे, जेथे विवाहात भाडेतत्वावर पाहुणे बोलाविले जातात आणि याकरता त्यांना रितसर पैसेही देण्यात येतात. तेथे या कामासाठी अनेक संस्था कार्यरत असून लोक त्यांची मदत घेतात.
दक्षिण कोरियात विवाहसोहळय़ामध्ये अधिकाधिक लोकांना बोलाविणे समाजातील त्यांच्या प्रतिष्ठेशी जोडून पाहिले जाते. विवाहसोहळय़ात जितके अधिक पाहुणे येतील तितकाच तो लोकप्रिय असल्याचे मानण्यात येते. दक्षिण कोरियात लोक समाजात स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी पाहुण्यांनाच भाडेतत्वावर बोलावतात. याकरता अनेक संस्थांची मदत घेण्यात येते.
दक्षिण कोरियात अशा अनेक यंत्रणा आहेत, ज्या पैसे घेऊन लोकांना भाडेतत्वावर पाहुणे उपलब्ध करतात. विवाहात पाहुणे म्हणून सामील होणाऱया लोकांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार करण्यात येते. विवाहात सामील झालेले हे लोक इतरांना कुटुंबाचा नातलग वाटावा अशाप्रकारे वागत असतात.
दक्षिण कोरियात भाडेतत्वावर पाहुणे मिळवून देणाऱया सर्वात प्रसिद्ध संस्थेचे नाव हॅगेक प्रेंड्स आहे. तेथे अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या लोकांना पैसे घेऊन पाहुणे उपलब्ध करतात.
कोरोना संकटामुळे विवाहसोहळय़ांमध्ये पाहुण्यांच्या सामील होण्यावर बंदी घालण्यात आली होती. पण आता पाहुण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. 250 लोक आता कुठल्याही सोहळय़ात सामील होऊ शकतात. दक्षिण कोरियात लोक विवाहसोहळय़ात 20 ते 25 नकली पाहुणे बोलावितात. एका पाहुण्यासाठी 25 डॉलर्स (1500 रुपये) इतके पैसे द्यावे लागतात.