112 वर्षे जुन्या लक्झरी स्टोअरची ऑफर
जागतिक महामारीदरम्यान जगात लाखो विवाह रद्द झाले आहेत. काहींनी विवाह लांबणीवर टाकला, तर काहींनी केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकला आहे. महामारी संपल्यावर विवाह करण्याचा निर्णय घेणारे काही लोक आहेत. याचदरम्यान ब्रिटनची राजधानी लंडन येथील 112 वर्षे जुन्या लक्झरी डिपार्टमेंटल स्टोअर सेल्फफ्रिजेसने ऑक्सफोर्ड स्ट्रीटवर प्रेमी जोडप्याला विवाहाच्या बंधनात अडकविण्याचा विडा उचलला आहे.
स्टोअरने पेमी जोडप्याचा विवाह लावून देत खर्च उचलण्याची ऑफर दिली आहे. स्टोअरने या ऑफरला ‘मायक्रो मॅरिज’ असे नाव दिले आहे. ब्रिटनमध्ये दीर्घकाळानंतर न्यू नॉर्मल सुरू झाले आहे. महामारीचा वेगही मंदावला आहे. याचमुळे लोकांनी बाहेर पडावे आणि खरेदी करावी असा स्टोअरचा उद्देश आहे.
स्टोअरची ही ऑफ मर्यादित काळासाठीच आहे. त्यानंतर स्टोअर विवाहासाठी निर्धारित रक्कम आकारणार आहे. याकरता स्टोअर तीन पॅकेजमध्ये विवाह करविणार आहे. यात वधू-वराच्या कपडय़ांपासून त्यांना सजविणे, भोजन आणि डीजे सेटची सुविधा असणार आहे. हा विवाह केवळ 4 तासांमध्ये होणार आहे.
युरोपमध्ये लसीकरणाने वेग पकडल्याने कोविड-19 महामारीच्या फैलावाचा वेग मंदावू लागला आहे. यामुळे अनेक देशांनी हिंडण्यावरील निर्बंध हटविले असल्याने पर्यटन पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. यातून आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा लोकांना आहे.
1909 मधील स्टोअर
सेल्फफ्रिजेस हे स्टोअर 1909 मध्ये सुरू झाले होते. महामारीच्या काळात स्टोअर बंद राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे. याचमुळे विक्री वाढविणे आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी ही ऑफर देण्यात आली आहे.