बेंगळूरमध्ये कोविड मार्गसूचीच्या पालनासाठी खबरदारी
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी बेंगळूर महानगरपालिकेने देखील खबरदारी उपाययोजना केल्या आहेत. कोविड मार्गसूचीचे पालन काटेकोरपणे व्हावे, याकरिता नजर ठेवण्यासाठी मार्शलशी नेमणूक करण्यात आली आहे. बुधवारी बेंगळूरमध्ये महापालिकेच्या मार्शलनी कल्याण मंटपांना अचानक भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी खबरदारी म्हणून राज्य सरकारने सुधारित मार्गसूची जारी केली आहे. त्यामध्ये विवाह समारंभांसाठी 500 पेक्षा अधिक जणांनी उपस्थित राहू नये अशी सूचना करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी विवाह समारंभांमध्ये सामाजिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे विवाह समारंभांवर करडी नजर ठेवण्यासाठी मार्शलची नेमणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
बुधवारी बेंगळूरमधील अनेक विवाह मंटपांना मार्शलनी भेट देऊन तेथील उपस्थितांना कोविड सुरक्षेविषयी सल्ले दिले. नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही दिला. सकाळीच विवाह कार्यालयांमध्ये हजर झालेल्या मार्शलनी उपस्थितांना मास्क वापरण्यास प्रवृत्त केले. मास्क नसणाऱयांना कार्यालयात प्रवेश दिला नाही. त्यामुळे गोंधळून गेलेल्यांनी तेंडाला रुमाल बांधून कार्यालयात प्रवेश केला.