रचना झंजाळ यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /पणजी
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) 66 व्या वर्षांत दमदारपणे प्रवेश केला आहे. ग्राहकांना समस्यांविना सेवा पुरविण्यासाठी तसेच विक्री आणि सेवा सुलभ करण्यासाठी एलआयसीने नेहमीच तंत्रज्ञानाला आत्मसात करीत समाजाभिमुख बनली आहे, असे प्रतिपादन एलआयसी म्हापसा शाखेच्या वरिष्ठ व्यवस्थापक रचना झंझाळ यांनी केले.
पणजी येथे ‘द क्राऊन’ हॉटेलच्या सभागृहात विमा एजंटांसाठी आयोजित खास मार्गदर्शन सत्रांत त्या बोलत होत्या. म्हापसा शाखेच्या विमा अधिकारी रूही च्यातीम वेर्लेकर यांच्या नेतृत्त्वाखाली व्यवसाय करणारे विमा एजंट या कार्यशाळेत सहभागी झाले होते. यावेळी व्यासपीठावर खास निमंत्रित म्हणून विमा एजंट बाबुसो शिवजी, एएओ अक्षय वर्मा, विकास अधिकारी रूही च्यातीम वेर्लेकर यांची उपस्थिती होती.
रचना झंझाळ यांनी आपल्या भाषणात विमा एजंटांसाठी जाहीर केलेल्या विविध व्यवसाय स्पर्धांची माहिती दिली. एलआयसीने पेपरलेस मॉडय़ुलद्वारे नवीन पॉलिसीसाठी ऑनबोर्डिग प्रक्रियेचे साधन म्हणून ‘आनंदा’ या मोबाइल ऍपचा शुभारंभ केला आहे. या ऍपसंदर्भातही त्यांनी माहिती दिली.
बाबुसो शिवजी यांनी आपल्या विमा व्यवसाय कारकिर्दीतील अनुभव कथन केले. नोकरीमागे न धावता या व्यवसायतही आपली कारकीर्द घडविता येते, असे ते म्हणाले. क्लब मेंबरशिपचे फायदेही त्यांनी विषद केले. तसेच एजंटांसाठी वैयक्तिक स्पर्धाही जाहीर केली. अक्षय वर्मा यांनी एजंटांना अर्ज भरतानाच्या मार्गदर्शकतत्त्वांची माहिती दिली.
दरम्यान, या सोहळय़ात चांगला व्यवसाय करणाऱया विमा एजंटांना सन्मानित करण्यात आले. रूही च्यातीम वेर्लेकर यांनी विविध विमा योजनांची माहिती दिली व गणेशोत्सव काळात चांगला व्यवसाय करावा, असे आवाहनही त्यांनी केले. रूही च्यातीम वेर्लेकर स्वागत व प्रास्ताविक केले, तर विमा एजंट सोनल लोटलीकर यांनी आभार मानले.