काँग्रेसचा सुवर्णविधानसौधवर धडक मोर्चा : चक्क ट्रक्टरमधून काढला मोर्चा : भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
प्रतिनिधी / बेळगाव
काँग्रेसमार्फत गुरुवारी राज्य सरकारच्या विरोधात विधानसौधवर भव्य मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क ट्रक्टरमधून सुवर्णविधानसौधला धडक दिली. त्यांचा हा ट्रक्टर मोर्चा लक्षवेधी ठरला. या मोर्चात विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजीमंत्री व आमदार आर. व्ही. देशपांडे आदी नेते सहभागी झाले होते.
शहरातील काँग्रेस कार्यालयापासून या मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. सुवर्णविधानसौधसमोर कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यातील भाजपचे सरकार कमिशन खाण्याबरोबर भ्रष्टाचारी सरकार असल्याच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. शिवाय भाजपचे सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला.
यावेळी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हणाले, आम्हाला मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्याची गरज नाही. राज्यातील भाजप भ्रष्टाचारासाठी बदनाम झाले आहे. भ्रष्टाचारी भाजप सरकारची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणीदेखील कार्यकर्त्यांनी केली.
काहीकाळ उडाला गोंधळ
विधानसौधसमोर मोर्चा येताच पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवणूक केली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. दरम्यान काहीकाळ गोंधळ उडाला. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.