प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेज आणि जत येथील राजे रामराव महाविद्यायाचे माजी प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर (वय 59) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सध्या राहणार कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरात असुन त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा जावई असा परिवार आहे.
डॉ. होनगेकर हे मूळचे बेळगाव परिसरातील बेळवट्टी गावचे. शेतकरी कुटुंबांत त्यांचा जन्म झाला होता. मामाकडे राहून शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या नोकरीची सुरुवात प्राथमिक शिक्षक म्हणून केली. प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच इंग्रजी विषयातून पदवी, पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध कॉलेजमध्ये त्यांनी नोकरी केली. डॉ. होनगेकर हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक व व्यवस्थापक मंडळाचे माजी सदस्य होते. इंग्रजी विषयाचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख होती.
प्राथमिक शिक्षक ते प्राध्यापक, प्राचार्यपदापर्यंत पोहचले होते. आपल्या आयुष्याची वाटचाल त्यांनी, ‘आज गगन ठेंगणे’या आत्मचरित्रात शब्दबद्ध केली आहे. तळमळीने काम करणारे प्राचार्य व मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. आजारपणामुळे त्यांनी जुलै महिन्यात स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. कोल्हापुरात नागाळा पार्क परिसरात वास्तव्यास होते. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा मागोवा घेत काम करणारा प्राध्यापक हरपला अशा भावना शिक्षणक्षेत्रातून उमटत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.