वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एअर मार्शल व्ही.आर. चौधरी यांना देशाचा पुढील वायुदलप्रमुख करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती संरक्षण दलाने दिली आहे. चौधरी हे सध्या वायुदलाचे उपप्रमुख आहेत. विद्यमान वायुदल प्रमुख आरकेएस भदौरिया हे 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. एअर मार्शल विवेक राम चौधरी यांनी 1 जुलै रोजीच वायुदलाच्या उपप्रमुखाचा पदभार स्वीकारला होता.
चौधरी यांना विविध प्रकारच्या लढाऊ तसेच प्रशिक्षण विमानांच्या 3,800 तासांहून अधिक काळाच्या उड्डाणाचा अनुभव आहे. एनडीए आणि संरक्षण सेवा स्टाफ कॉलेज, वेलिंग्टनचे चौधरी हे माजी विद्यार्थी आहेत. उपप्रमुख होण्यापूर्वी ते वायुदलाच्या पश्चिम कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते.