प्रतिनिधी/ पणजी
कुडचडे, दुधगाळ-सावर्डे येथील विवेक परीसनाथ नाईक यांना यावर्षी ‘कौशल्यचार्य 2020’ या राष्ट्रीय स्तरावरील आभियांत्रिकींना देण्यात येणारा पुरस्कार प्राप्त झाला आहे. गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते विवेक नाईक यांना हा पुरस्कार देण्यात आला.
विवेक परीसनाथ नाईक हे पेशाने आयटीआय येथे इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षक आहेत. 1993 रोजी होंडा-सत्तरी येथील आयटीआयमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले होते. यानंतर विवेक नाईक यांनी आतापर्यंत बोर्डे-मडगाव, काणकोण, फर्मागुडी व काकोडा-कुडचडे येथे सेवा बजावली असून अजूनही ते सेवेत कार्यरत आहेत. विवेक नाईक यांचे आयटीआय क्षेत्रात अमूल्य योगदान असून या काळात त्यांनी अनेक दर्जेदार विद्यार्थी घडविले आहेत.
विवेक नाईक यांनी राज्याच्या विकासासाठीदेखील आपले बहुमूल्य योगदान दिले आहे. आतापर्यंत विवेक नाईक यांना आयडीएम पुरस्कार, सरकारी कर्मचारी सांस्कृतिक मंचचा पुरस्कार, गोमंतक मराठा समाजाचा पुरस्कार, सावर्डे येथील लोकमान्य क्लबचा पुरस्कार तसेच कोरोनाच्या काळात समाजात निःस्वार्थ काम केल्याबद्दल सांगे येथील उपजिल्हाधिकाऱयांतर्फे प्रोत्साहनपूर्वक प्रशस्तीपत्र यासारखे अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत.