महाराष्ट्राचे भूमिपुत्र : भदौरिया यांच्याकडून पदभार स्वीकारला
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख बनले आहेत. त्यांनी गुरुवारी एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांच्याकडून नवीन हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ते महाराष्ट्राचे भूमिपुत्र असून नांदेड जिल्हय़ाशी त्यांचे जवळचे नाते आहे. त्यांचे आजोबा नांदेडच्या हदगाव तालुक्मयातील हस्तरा या गावात काही काळ वास्तव्यास होते. चौधरी यांच्या या मराठमोळय़ा कनेक्शनमुळे संबंध नांदेड जिह्यासह महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे यापूर्वी लडाख सेक्टरचे प्रभारी होते. ते 1982 मध्ये भारतीय हवाई दलात सामील झाले होते. त्यांनी मिग-29 लढाऊ विमानाचे सारथ्य केले असून 39 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक कमांड आणि स्टाफ नेमणुका केल्या आहेत. यापूर्वी ते हवाई दलाचे सह-प्रमुख म्हणून तैनात होते. हवाईदल उपप्रमुख बनण्यापूर्वी ते वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते. तसेच हवाई दल अकादमीमध्ये प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्याकडे मिग-21, मिग 23 एमएफ, मिग-29 आणि सुखोईö30 एमकेआय लढाऊ विमानांच्या ऑपरेशनल फ्लाइंगसह 3,800 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. चौधरी हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
42 वर्षांच्या सेवेनंतर भदौरिया निवृत्त
निवृत्त हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया गुरुवारी हवाई दलातून निवृत्त झाले. ते 42 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 36 राफेल आणि 83 मार्क-ए स्वदेशी तेजस जेट्ससह मेगा फायटर एअरक्राफ्ट करारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची कारकीर्द मिग-21 उडवून सुरू केली आणि नंतर त्याच एअरबेसवर आणि त्याच स्क्वाड्रनसह संपली. माजी एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी 13 सप्टेंबर रोजी हलवाडा येथे 23 स्क्वेअर, हवाईदल प्रमुख म्हणून लढाऊ विमानात शेवटचे उड्डाण केले. निवृत्त होण्यापूर्वी, निवृत्त हवाई दल प्रमुखांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे श्रद्धांजली वाहिली. एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी सप्टेंबर 2019 मध्ये हवाईदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांना जून 1980 मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शाखेत समाविष्ट करण्यात आले आणि अनेक पदांवर काम केले.