प्रतिनिधी/मिरज
विशाळगडहून परतत असताना मानोली येथे रिक्षा नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात मिरजेतील महिला ठार झाली आहे. हिना सर्फराज मुसा (३२, रा. माणीकनगर, मिरज) असे मयत महिलेचे नाव आहे. तर तिचा पती सर्फराज (३६), मुलगा महमंद अली (११) हे गंभीर तर व मुलगी सभा (५) व चालक इनायत (४०) हे जखमी झाले आहेत.
मिरज येथील मुसा कुटुंबासह अन्य सहा कुटुंबे पाच रिक्षा करून विशाळगडाला दर्गा दर्शनास गेले होते. नवस फेडून सायंकाळी मिरजेला परतत असताना पुढे आलेली रिक्षा मानोली गावाजवळ येताच अवघड वळणावरील नाल्यात पन्नास फूट खोल कोसळली. नाल्यातील बॉक्साइटच्या खडकावरून आदळत रिक्षा तीन पलटी घेऊन थांबली. मुसा रिक्षात अडकल्याने डोक्याला दुखापत होऊन जागीच ठार झाल्या.