अवेअर फौंडेशनच्या सहाय्याने मदतीसाठी पुढाकार, देशातील गरीब व गरजू मुलांच्या शिक्षणासाठी 8 लाखांची मदत
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल अनेकवेळा प्राण्यांची आणि गरीब मुलांची मदत करण्यासाठी पुढे येत असतो. अशाच प्रकारे त्याने समाजातील गरीब व गरजू मुलांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याने 2019 मधील वनडे विश्वचषकातील आपल्या बॅटचा लिलाव केला. तसेच ग्लोव्हज, पॅड्स आणि हेल्मेट अशा वस्तूंचाही लिलाव केला. या लिलावात राहुलच्या बॅटला सर्वाधिक 2,64,228 इतकी रक्कम मिळाली आहे. याव्यतिरिक्त त्याच्या हेल्मेटला 1,22,677 रुपये आणि पॅड्सला 33, 028 रुपये मिळाले. तसेच राहुलच्या वनडेतील जर्सीला 1, 13, 240 रुपये, टी-20 तील जर्सीला 1,04,842 आणि कसोटीतील जर्सीला 1,32,774 रुपये तर ग्लोव्ह्जला 28,782 रुपये मिळाले. राहुलने 18 एप्रिलला आपला 28 वा वाढदिवस साजरा केला होता. त्याचवेळी त्याने बॅटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता.
‘मी माझे क्रिकेट पॅड्स, ग्लोव्ह्ज, हेल्मेट आणि माझ्या जर्सीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. ते लोक या सर्व वस्तूंचा लिलाव करणार आहेत. तसेच यातून मिळणारा निधी अवेअर फाऊंडेशनमध्ये देण्यात येणार आहे. हे फाऊंडेशन देशातील गरीब व गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदत करत असते, असे राहुलने यावेळी सांगितले.