नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय हॉकी संघातील स्टार गोलरक्षक पीआर श्रीजेश भले आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात असला तरी अद्याप निवृत्त होण्याचा कोणताही विचार नसून विश्वचषकातील पदक जिंकणे हे आपले पुढील लक्ष्य असेल, अशा शब्दात त्याने आपली महत्त्वाकांक्षा व्यक्त केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱया भारतीय संघात समावेश राहिलेल्या या दिग्गज खेळाडूचा जागतिक हॉकीमधील सर्वोत्तम गोलरक्षकांमध्ये प्राधान्याने समावेश होतो. 2006 मध्ये त्याने वरिष्ठ संघात पदार्पण केले आहे.
6 महिन्यांच्या सक्तीच्या ब्रेकनंतर श्रीजेश दक्षिण आफ्रिका व फ्रान्सविरुद्ध आगामी एफआयएच प्रो लीग सामन्यात खेळणार असून या पार्श्वभूमीवर त्याने वृत्तसंस्थेशी संवाद साधला.
श्रीजेशने नेतृत्व सांभाळताना 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत भारतीय संघाला धडक मारुन दिली. शिवाय, 2014 आशियाई सुवर्णजेत्या संघातही त्याचा समावेश होता. मात्र, गतवर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने 41 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ऐतिहासिक कांस्य जिंकले, तो श्रीजेशसाठी आजवरचा सर्वोत्तम क्षण ठरला. अर्थात, यानंतरही तो फारसा समाधानी नसून पुढील वर्षी विश्वचषक स्पर्धेत पदक जिंकून देण्यासाठी तो महत्त्वाकांक्षी असेल, हे निश्चित आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या आसपास तो कारकिर्दीची यथोचित सांगता करण्याबद्दल निर्णय घेईल, असे संकेत आहेत.
‘ऑलिम्पिक पदक जिंकणे, हे स्वप्न होते. पण, आणखी सरस कामगिरी साकारणे हे माझे आताही लक्ष्य आहे. 2022 चे वर्ष आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. एफआयएच प्रो लीग, त्यानंतर राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत लक्षवेधी योगदान देण्याचा आमचा प्रयत्न असेल’, असे श्रीजेश पुढे म्हणाला. भारतीय महिला संघाची कर्णधार रानी रामपाल हिच्यानंतर वर्षातील सर्वोत्तम वर्ल्ड गेम्स ऍथलिट पुरस्काराचा तो केवळ दुसरा भारतीय आहे.
‘आशियाई स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळेल आणि त्यामुळे आणखी मनोबल उंचावण्याची संधी असेल. मागील विश्वचषकात आम्ही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलो नव्हतो. आगामी विश्वचषकात पदक जिंकणे, हे त्यामुळे माझे मुख्य लक्ष्य असेल’, असे श्रीजेश स्पष्टीकरणार्थ म्हणाला. भविष्यातील स्पर्धांचा फारसा विचार न करता छोटय़ा टप्प्यातील उद्दिष्टय़े साध्य करण्यावर भर असेल, याचाही त्याने येथे उल्लेख केला. ज्यावेळी आपण पूर्ण क्षमतेने खेळू शकणार नाही, याची जाणीव होईल, त्याच क्षणी निवृत्त होईन, असे हा दिग्गज खेळाडू म्हणाला.
‘या वर्षात सुरु होणाऱया ऑलिम्पिक सायकलवर आमचे लक्ष असेल आणि यासाठी प्रो लीगमध्ये उत्तम सुरुवात करण्यावर आम्ही भर देणार आहोत. सुदैवाने गोलरक्षकासाठी वय हा अजिबात अडथळा नसतो. खेळाप्रती तळमळ, बांधिलकी अधिक महत्त्वाची असते. सध्याच्या घडीला भविष्याबद्दल मी फारसा विचार करत नाही. याऐवजी विश्वचषकावर लक्ष केंद्रित करणे हा प्राधान्यक्रम असेल. देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्रत्येकाला मिळत नसते. यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते’, असे श्रीजेशने यावेळी नमूद केले.