वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सर्बियातील बेलग्रेड येथे होणाऱया आगामी विश्वचषक वैयक्तिक कुस्ती स्पर्धेतून भारताच्या अनेक आघाडीच्या पुरूष आणि महिला मल्लांनी माघार घेतली आहे. सदर स्पर्धा 12 ते 18 डिसेंबर दरम्यान सर्बियामध्ये घेतली जाणार आहे.
भारताचे अव्वल पुरूष मल्ल बजरंग पुनिया, जितेंद्र किना, सोमवीर हे या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. 2020 च्या आशियाई कुस्ती स्पर्धेत जितेंद्र किनाने पुरूषांच्या 74 किलो फ्रीस्टाईल गटात रौप्यपदक मिळविले होते. महिला विभागात विनेश फोगटने या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनला कळविला आहे. गेल्या बुधवारी बजरंग पुनियाचा विवाह संगीता फोगट बरोबर झाला होता. सर्बियातील होणाऱया या विश्वचषक कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्लाला 25 हजार डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे. कोरोना महामारी समस्येमुळे सर्बियातील विश्वचषक कुस्ती स्पर्धेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून आता ही स्पर्धा विश्वचषक वैयक्तिक कुस्ती स्पर्धा म्हणून होणार आहे. या स्पर्धेसाठी कोणतीही चांचणी स्पर्धा घेतली गेली नाही, अशी माहिती फेडरेशनचे विनोद तोमर यांनी दिली.