इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या संसदेमध्ये मांडण्यात आलेला विश्वासदर्शक ठराव अखेर पंतप्रधान इम्रान खान यांनी जिंकला आहे. या विजयामुळे इम्रान खान यांची सत्तेची खुर्ची अबाधित राहिली आहे. विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी 172 मतांची आवश्यकता असताना इम्रान खान यांना 178 सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यात यश आल्यामुळे सरकार सुरक्षित राहिले आहे. पाकिस्तानच्या संसदेचे कनि÷ सभागृहात एकूण 342 सदस्य आहेत. त्यापैकी इम्रान खान यांच्या सत्ताधारी तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे 156 सदस्य आहेत. इतर सदस्यांच्या पाठिंब्यावर इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये सरकार स्थापन केले होते.
या आठवडय़ाच्या सुरुवातीला पाकिस्तानचे अर्थमंत्री अब्दुल हफीज शेख सिनेट निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या संसदेत असलेल्या विरोधी पक्ष पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंट पक्षाने पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावरून विरोधकांनी रान उठवल्यानंतर इम्रान खान यांनी स्वतःच विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. विश्वासदर्शक मतदानावेळी पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंटसह एकूण 11 विरोधी पक्षांनी सभात्याग केल्यामुळे विरोधकांशिवायच झालेल्या विश्वासदर्शक मतदानात इम्रान खान विजयी झाल्याचे अध्यक्षांनी घोषित केले. इम्रान यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिल्याची प्रतिक्रिया तेहरीक ए इन्साफच्या नेत्यांकडून दिली जात आहे.
…..