लॉर्ड्स मैदानावर 18 ते 22 जूनदरम्यान अंतिम लढतीचे आयोजन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उद्घाटनाच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम लढत आता दि. 18 ते 22 जून या कालावधीत खेळवली जाईल, अशी घोषणा आयसीसीने केली. 23 जूनचा दिवस राखीव असेल. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, ही लढत दि. 10 ते 14 जून या कालावधीत खेळवली जाणार होती. ही अंतिम लढत व 2021 आयपीएलची अंतिम लढत यांच्यात पुरेसा अवधी असावा, यासाठी हा निर्णय घेतला गेला, असे संकेत आहेत.
या अंतिम लढतीत भारत खेळण्याची शक्यता चर्चेत आहे. सोमवारी जाहीर केल्या गेलेल्या ताज्या मानांकन यादीत भारत व न्यूझीलंड पहिल्या दोन स्थानी विराजमान आहेत. भारताने 5 मालिकांमध्ये 430 तर न्यूझीलंडनेही 5 मालिका खेळत 420 गुणांची कमाई केली आहे.
भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशिपअंतर्गत इंग्लंडविरुद्ध आणखी एक मालिका खेळणार आहे तर सध्या तिसऱया स्थानी विराजमान असलेल्या ऑस्ट्रेलियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका होणार आहे. जागतिक चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला नमवणे क्रमप्राप्त असणार आहे.
गतवर्षी आयसीसीने कोव्हिड-19 च्या संकटामुळे गुणांकन पद्धतीत काही बदल केले आणि त्यानुसार गुणांच्या अधिक टक्केवारीवर क्रमवारी निश्चित केली गेली. सोमवारीच ईसीबीने न्यूझीलंडविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने आपल्या उन्हाळी हंगामाची सुरुवात होत असल्याचे जाहीर केले. या दोन लढती अनुक्रमे लॉर्ड्स (2 ते 6 जून) व एजबॅस्टन (10 ते 14 जून) येथे खेळवल्या जाणार आहेत.
जागतिक कसोटी मालिकेची ताजी मानांकन यादी
संघ / मालिका / मालिकाविजय / सामने / विजय / पराभव /अनिर्णीत / गुण
भारत / 5 / 4 / 13 / 9 / 3 / 1 / 430
न्यूझीलंड / 5 / 3 / 11 / 7 / 4 / 0/ 420
ऑस्ट्रेलिया / 4 / 2 / 14 / 8 / 4 / 2 / 332
इंग्लंड / 5 / 4 / 17 / 10 / 4 / 3 / 412
द. आफ्रिका / 3 / 1 / 9 / 3 / 6 / 0 / 144
पाकिस्तान / 5 / 2 / 10 / 2 / 5 / 3 / 166
श्रीलंका / 4 / 0 / 8 / 1 / 6 / 1 / 80.