नवी दिल्ली
कोरोना व्हायरस महामारीच्या संकटामुळे येत्या जूनमध्ये होणारी अमेरिकन खुली विश्व टूर सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धा तहकूब करण्याचा निर्णय विश्व बॅडमिंटन फेडरेशनने घेतला आहे. कोरोना महामारीच्या भीषण संकटात आतापर्यंत संपूर्ण जगात बळींची संख्या दोन लाखापेक्षा अधिक असून सुमारे 30 लाख लोकांना याची बाधा झाली आहे. कॅलिफोर्नियातील फुल्लेरटोन येथे 23 ते 28 जून दरम्यान योनेस पुरस्कृत अमेरिकन खुली विश्व टूर सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केली होती पण अमेरिकन बॅडमिंटन फेडरेनबरोबर चर्चा करूनच सदर स्पर्धा तहकूब करण्याचा निर्णय विश्व बॅडमिंटन फेडरेशनने घेतला आहे.
2017 साली भारताच्या एच.एस. प्रणॉयने अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीचे जेतेपद मिळविले होते. कोरोना व्हायरस महामारीमुळे विश्व बॅडमिंटन फेडरेशनने मे, जून, जुलै दरम्यान होणाऱया सर्व बॅडमिंटन स्पर्धा तहकूब करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. गेल्या महिन्यात विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या नियंत्रण समितीने 17 ते 22 मार्च दरम्यानची स्वीस खुली सुपर 300, 24 ते 29 मार्च इंडिया खुली सुपर 500, 31 मार्च ते 5 एप्रिल दरम्यानची मलेशिया खुली सुपर 750, 7 ते 12 मार्च दरम्यानची सिंगापूर खुली सुपर 500 आणि 21 ते 26 एप्रिल दरम्यानची आशियाई बॅडमिंटन स्पर्धा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.