प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड झाल्यानंतर आता 16 जानेवारीला चार विषय समिती सभापतींची निवड होणार आहे. आघाडीतील शिवसेना, स्वाभिमानीसह स्थानिक विकास आघाडय़ांच्या सदस्यांनी सभापती पदाची मागणी केली आहे. त्यामुळे या पदांची विभागणी करताना नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात 16 जानेवारीला दुपारी दोन वाजता विशेष सभेचे आयोजन केले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी निवडीबाबतची नोटीस काढली असून करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना या निवडीसाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड गुरुवारी झाली. सर्व पदाधिकाऱयांना किती कालावधी मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. अध्यक्षपद काँग्रेसकडे असून, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे. चार विषय समित्यांपैकी तीन शिवसेनेला, तर एक ’स्वाभिमानी’ला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हंबीरराव पाटील, डॉ. पद्माराणी पाटील यांचे नाव चर्चेत
’स्वाभिमानी’च्या शुभांगी शिंदे यांनी याआधी महिला व बालकल्याण समिती सभापतिपद भूषविल्याने अन्य सदस्या डॉ. पद्माराणी पाटील यांची निवड निश्चित मानली जात आहे. शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या गटाचे सदस्य हंबीरराव पाटील यांना बांधकाम समिती देण्याची शक्यता आहे. आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, सुजीत मिणचेकर यांच्या गटाच्या सदस्यांनाही पदाची शक्यता आहे. त्यामुळे या सर्वांपैकी प्रथम संधी कोणाला याबाबत रस्सीखेच सुरू आहे.