कामगार खात्याचे स्पष्टीकरण : कंपनीतील कर्मचाऱयांना योग्य वेतन न दिल्याचे उघड
प्रतिनिधी / बेंगळूर
कोलार जिल्हय़ातील नरसापूर औद्योगिक वसाहतीतील विस्ट्रॉन कंपनीत कर्मचाऱयांनी हिंसक होत साहित्योपकरणांची मोडतोड केली होती. यासंबंधी कर्नाटक कामगार खात्याने प्रतिक्रिया दिली असून कंपनीने कामगारांच्या हक्कांचे उल्लंघन केले आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱयांना दिलासा मिळाला आहे.
कर्मचारी उपलब्ध करून दिलेले एजन्सी आणि कंपनीच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत आहे. कामानुसार कर्मचाऱयांना वेतन देण्यात आले नसल्याचे या माहितीवरून उघडकीस आले आहे. कंपनीने कर्मचाऱयांच्या समस्या सोडविल्या नसल्याचे उघड झाले आहे. कर्मचाऱयांना वेतन देण्यास विलंब झाल्याची माहिती मनुष्यबळ विभागाला देऊन सुद्धा त्याची दखल घेण्यात आलेली नाही, असे कामगार खात्याने म्हटले आहे.
राज्य कामगार खाते,, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य खात्याच्या संचालकांनी तयार केलेल्या प्राथमिक अहवालात विस्ट्रॉन कंपनीतील कर्मचाऱयांवर वेतन देण्याच्या बाबतीत अन्याय झाला असल्याचे नमूद आहे. अतिरिक्त कामे करून घेणे आणि कामगार कायद्यांचे उल्लंघन करून महिला कर्मचाऱयांची देखील पिळवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही कामगार खात्याने म्हटले आहे.