बेळगाव : कोरोनामुळे ख्रिश्चन व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याची माहिती विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना कळविण्यात आली. त्यांनी तातडीने वाघवडे येथे दाखल होऊन ख्रिश्चन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. जात-पात विसरून हे कार्य केल्यामुळे एक वेगळा संदेश देण्यात आला आहे.
वाघवडे येथील जोसेफ रॉकी गोन्साल्विस यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तेथीलच सामाजिक कार्यकर्ते डिक्रूज यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना संपर्क साधला. त्यानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते गजानन बिरादार, प्रवीण जमखंडी, विनायक परीट, नरेश शिंदे यांनी वाघवडे येथे जाऊन प्रिस्ट फादर व्हिक्टर गोम्स पॅरीस यांच्या उपस्थितीत जोसेफ यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने विनाशुल्क रुग्णवाहिका व शववाहिका सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 15 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.