प्रतिनिधी / पेडणे
ओशालबाग धारगळ येथील नारायण कोनाडकर या 64 वषीय इसामाने आपल्या घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी 5 वाजता ओशालबाग धारगळ येथे एका इसामाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पेडणे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी गेले असता सदर इसमाचा मृतदेह विहिरीतून वर काढला होता. पेडणे पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात शिवचिकित्सेसाठी पाठवून दिली.
मयत नारायण कोनाडकर हे विवाहित असून त्यांना पत्नी व दोन मुले आहेत. नारायण कोनाडकर यांनी का विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली हे कळले नाही. यासंबंधीचा तपास पेडणे पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी करत आहेत.