खटाव / वार्ताहर :
खटाव पुसेगाव रोडलगत शिंदे वस्ती शिवारात विनय माने यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने जीवदान दिले. 30 फूट खोल विहिरीत उतरून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्सी व पोत्याच्या मदतीने कोल्ह्याला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
येथील शेतकरी विनय माने यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत कोल्हा पडला होता. विनय माने आपल्या मुलांना घेऊन नेहमीप्रमाणे आंघोळीला आले आसता त्यांच्या कन्येला हा कोल्हा दिसला. याची माने यांनी तात्काळ माहिती वनविभागाला दिली. यानंतर वनविभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व दोरी व पोते घेऊन स्थानिकांच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीत उतरून कोल्ह्याला केवळ पंधारा मिनिटातच सुरक्षितपणे बाहेर काढले.
वनक्षेत्रपाल शितल पुंदे म्हणाल्या, पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात अंधारामध्ये विहिर न दिसल्याने कोल्हा विहिरीत पडला होता. या कोल्ह्याची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी करून तो सुरक्षित असल्याची खात्री केली. त्यानंतरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. अलिकडे भक्षाच्या वा पाण्याच्या शोधात वन्यप्राणी विहिरीमध्ये पडण्याच्या घटना घडत आहेत. स्थानिकांनी अशा बाबतीत वन्यप्राण्यांना इजा न करता वनविभागाशी त्वरीत संपर्क साधून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.