बेकिनकेरे येथील घटनेने हळहळ, सुदैवाने एक जण बचावला
प्रतिनिधी/ बेळगाव
खेळत असताना शिवारात असलेल्या पडक्मया विहिरीमध्ये पाय घसरुन पडल्याने दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी बेकिनकेरे गावात घडली. या घटनेत सुदैवानेच एक मुलगा बचावला आहे. या घटनेमुळे बेकिनकेरे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लोकेश विठ्ठल पाटील (वय 10, रा. बेकिनकेरे) व निखिल रामू बोंदे (वय 8, रा. ढेकोळी, ता. चंदगड) अशी त्या दुर्दैवी मुलांची नावे आहेत. शाळेला सुटी असल्यामुळे ही मुले खेळण्यासाठी घरामागे असलेल्या शिवारामध्ये गेली. गावापासून अर्धा कि.मी. असलेल्या पडक्मया विहिरीजवळ खेळताना तोल जावून लोकेश आणि निखिल विहिरीत पडले. त्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत खेळणारा एक मुलगा मात्र सुदैवाने बचावला आहे.
निखिल हा मामाच्या गावी आला होता. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी त्या विहिरीकडे धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती काकती पोलिसांना देण्यात आली. काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर, उपनिरीक्षक ए. आय. अविनाश, शिवानंद कौजलगी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गावकऱयांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते. लोकेशच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजी, काका, काकी असा परिवार आहे. सुटी असल्याने निखिल हा मामाच्या गावी आला होता. ही घटना घडल्याने निखिलच्या कुटुंबीयांनीही आक्रोश केला होता.
निखिल याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. सुगी हंगाम जोरात सुरू असल्यामुळे सर्व जण सुगी कामात गुंतले असताना ही घटना घडली आहे. बेकिनकेरे परिसरात अशा पडक्मया अनेक विहिरी आहेत. त्या धोकादायक ठरत आहेत. तेव्हा अशा विहिरी बुजविणेच गरजेच्या असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.