जत , प्रतिनिधी
वाळेखिंडी (ता. जत) येथे विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेलेल्या आठ वर्षाच्या मुलाचा विहिरीत बडून मृत्यू झाला. यश सतीष तोरणे (मुळ रा. लोहगाव, ता.जत) असे मयत बालकाचे नाव असून सायंकाळी 4 वाजण्याच्या पूर्वी ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात ग्रामीण रूग्णालयाचे डाॅक्टरांनी फोनवरुन माहिती दिली.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, यश हा आपल्या आजोळी काही दिवसांपासून राहायला आला होता. यश व त्याचा मामे भाव दोघेही खेळत असताना यशचा तहान लागली तो जवळच असलेल्या विहिरीमध्ये पाणी पिण्यासाठी उतरला. दरम्यान, त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याचा मामेभाव ओरडत घरच्यांना सांगण्यासाठी गेला.
मात्र, नातेवाईक पोहोचेपर्यंत यशचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद झाली असून पुढील तपास पोलिस नाईक हाक्के करत आहेत.