पोहायला गेल्यानंतर निपाणी येथील दुर्घटना – मृत कोल्हापूर येथील
प्रतिनिधी/ निपाणी
पोहायला गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना निपाणी येथील निपाणकरवाडा येथे मंगळवारी सकाळी 8.30 च्या सुमारास घडली. रणवीर दीपक सूर्यवंशी (वय 13, सोमवारपेठ, कोल्हापूर) असे मृत मुलाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, रणवीर हा काही दिवसांपूर्वी निपाणी येथील शिवाजी चौक येथे राहणाऱया आपल्या मामाकडे आला होता. मंगळवार दि. 8 रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास निपाणकरवाडा येथे असलेल्या विहिरीवर तो पोहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने कमरेला रबरी टय़ुब बांधली होती. त्याने विहिरीत उडी टाकताच कमरेची टय़ुब सुटल्याने तो विहिरीत बुडाला.
यावेळी तेथील उपस्थितांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आढळून आला नाही. दरम्यान अथक परिश्रमानंतर कोल्हापूर येथील दिनकर कांबळे यांनी रणवीरचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. घटनास्थळी शहर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, हवालदार संदीप मातीवड्डर, बसवराज नावी यांनी भेट देऊन पंचनामा केला. शहर पोलीस स्थानकात सदर घटनेची नोंद झाली आहे. रणवीर याच्या पश्चात आई, वडील आहेत. एकुलता एक मुलगा या दुर्दैवी घटनेत गेल्याने सूर्यवंशी कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.