प्रतिनिधी / बेळगाव
ऊस पिकावर कीटकनाशक फवारणी करताना तुटून पडलेल्या विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने विजेचा जबर धक्का बसून शेतकऱयाचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी बेळगुंदी येथे ही घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे. यासंबंधी हेस्कॉम अधिकाऱयांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
विक्रम महादेव पावसकर (वय 35, रा. बेळगुंदी) असे त्या दुर्दैवी शेतकऱयाचे नाव आहे. बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून रात्री उचगाव हेस्कॉम विभागाचे सेक्शन ऑफीसर व लाईनमनविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम हा ऊस पिकावर औषध फवारणी करत होता. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास तुटून पडलेल्या विद्युतभारित तारेचा स्पर्श होऊन त्याला जबर धक्का बसला. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे शेतकऱयाचा बळी गेला आहे. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.