प्रतिनिधी / कोल्हापूर
वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केल्यानंतर वीज पुरवठा पुर्ववत जोडून देण्यासाठी आकारले जाणारे पुर्नजोडणी शुल्क हे नियमानुसार आहे. यास महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची मंजुरी प्राप्त आहे. वीज बिले वेळेत न भरणाऱ्या ग्राहकांना अटकाव करण्याचे उद्देशाने पुर्नजोडणी शुल्काची तरतूद करण्यात आलेली आहे. सिंगल फेज मीटर धारकांसाठी 300 रुपये थ्री फेज मीटर धारकांसाठी 500 रुपये असे पुर्नजोडणी शुल्काचे दर आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांना वीज बिलाचा भरणा केल्यांनतर खंडित वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी पुर्नजोडणी शुल्क भरणे क्रमप्राप्त आहे.
महावितरणची आर्थिक सद्यस्थिती लक्षात घेऊन घरगुती, वाणिज्य, औद्योगिक यासह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना महावितरणकडून वीज बिल भरणेबाबत वेळोवेळी आवाहन करण्यात आले आहे. ग्राहकांना कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून , भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधून, नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेश पाठवून वारंवार वीज बिल भरण्याबाबत विनंती केली आहे. वीज बिलाच्या वसुलीसाठी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. तरी वीजग्राहकांनी वीज पुरवठा खंडितची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत व चालू वीज बिले भरून सहकार्य करावे, असे महावितरणचे आवाहन आहे.