वेतोऱयातील प्रकाराबाबत जि. प. अध्यक्षांनी वेधले पोलीस अधीक्षकांचे लक्ष
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
वेतोरे पालकरवाडी आणि वरचीवाडी परिसरात भर वस्तीत 11 केव्हीची विद्युत वाहिनी नेताना वीज वितरणच्या अधिकाऱयाकडून दमदाटी केली जात असल्याची तक्रार जि. प. अध्यक्षा समिधा नाईक यांनी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याजवळ केली आहे.
कुडाळ-दाभोली या वर्दळीच्या मार्गावर रस्त्याच्या बाजूने नवीन 11 केव्हीची विद्युत वाहिनी नेण्यात येत आहे. वेतोरे वरचीवाडी व पालकरवाडी या ठिकाणी लोकांची घरे, तीन प्राथमिक शाळा, मंदिरे, शेती आणि बागायती असल्याने स्थानिक ग्रामस्थांचा या विद्युत वाहिनीला विरोध आहे. याबाबत वीज कंपनीच्या अधिकाऱयांना निवेदनाद्वारे लक्ष वेधूनही दखल घेतलेली नाही.
ज्या कंपनीसाठी 11 केव्हीची विद्युत वाहिनी नेली जाते, त्या कंपनीला विरोध नाही. परंतु भरवस्तीतून वाहिनी नेली जात असल्याने विरोध आहे. त्यांनी भूमिगत वाहिनी टाकावी. त्याला विरोध नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे तसेच ग्रामस्थांचा एवढा विरोध असताना 11 केव्ही विद्युत वाहिनी नेली जात आहे आणि तीही पोलिसांच्या साहय़ाने दमदाटी करून नेण्यात येत आहे.
पोलिसांची दमदाटी तात्काळ थांबवावी आणि ग्रामस्थांच्या मागणीचा विचार व्हावा, अशी मागणी जि. प. अध्यक्षांनी केली आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.